उरुळीकांचनः येथील मध्यवर्ती भागात पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन पैसे मागणाऱ्यास आपल्या घरी बोलावून त्याच्यावर गोळ्या झाडण्याची खळबळजन घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणातील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या उद्योजकास अटक केली असून, कारवाईमध्ये पोलिसांनी एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुसे व पिस्टलचे ४० जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. तसेच मुख्य आरोपी व त्यास या गुन्ह्यासाठी मदत करणाऱ्या इतर साथीदारांना देखील अटक केली आहे.
घरी बोलावून झाडल्या गोळ्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी कालुराम महादेव गोते व शरद कैलास गोते यांचे आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे यांच्याशी आर्थिक व्यवहार झाले होते. सदर व्यवहारामध्ये फिर्यादींनी आरोपीकडे चाळीस लाख रुपये दीड वर्षांपूवी दिले होते. सदरची रक्कम परत देतो, असे सांगून आरोपी यांने फिर्यादी व त्यांचे साथीदार कालुराम गोले यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्याच्या रागातून आरोपीने त्यांच्याकडील परवाना असलेल्या पिस्टलमधून चार राउड फायरिंग केले. या घटनेत कालुराम गोते यांच्या हाताला व पायाला गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ झालेल्या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशनमधील वेगवेगळी पथके आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळून गेल्याच्या मार्गाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपून बसलेला आहे. त्यानुसार सदर ठिकाणाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे वय ४६ वर्ष रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि. पुणे याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी अधिक तपास केला असता, सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे याने त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य १) निलीमा बापू उर्फ दशरथ शितोळे वय ४२ वर्षे २) जिग्नेश बापू उर्फ दशरथ शितोळे १९ वर्षे ३) आशा सुरेश घोसले वय ५२ वर्षे ४) निखील अशोक भोसले वय २५ वर्ष सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि. पुणे यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपीतांना न्यायालयाने दिनांक १८/०९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकपंकज देशमुख, पुणे प्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, बाळासाहेब कोरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, माळासाहेब खडके,अंमलदार अजित कराळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा मुतवळ यांच्या पथकाने केली असून पुढील तपास उरुळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.