जेजुरीः समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी गावकरी ट्रस्ट, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्यामध्ये गौतमेश्वर मंदिर (छत्रीचे मंदिर) या ठिकाणी २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सोमवती अमावस्या यात्रेच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. २ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जेजुरी गडावरुन खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ होणार आहे.
पायरी मार्गाने खाली नंदी चौक, छत्री मंदिर, जानुबाई मंदिर, धालेवाडी मार्गे क-हा नदीच्या दिशने देवाचा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळा कऱ्हा नदीवर पोहचल्यानंतर पालखीमधील उत्सवमुर्तींना कऱ्हेच्या पवित्र पात्रात स्नान घातले जाणार आहे. त्याच ठिकाणी विधवत पूजा अर्चा आदी कार्यक्रम पार पडतील. त्यानंतर धालेवाडी गाव, कोरपड मळा, विद्यानगर मार्गे पालखी सोहळा गावात आल्यानंतर ग्रामदैवत जानुबाई मंदिर येथे विसाव्यासाठी थांबेल. तिथून रात्री मारुती मंदिर, महाद्वार पेठेतून पायरी मार्गाने गडावर पालखी सोहळा येईल. गडावर रोजमाराचे वाटप करण्यात आल्यानंतर सोहळ्याची सांगता करण्यात येईल.
मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत दाखल होण्याची शक्यता
जेजुरीतील नागरिकांची तहान भागविणाऱ्या नाझरे धरण (मल्हार सागर) या धरणातील पाणीसाठा पाऊसअभावी तळाला गेला होता. यामुळे येथीन नागरिकांना पाणीटंचाईच्या भीषण संकटाला तोंड देण्याची वेळ आली होती. आता चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने कऱ्हा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. परिणामी नाझरे धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्भूमीवर २ सप्टेंबर रोजी होणारी सोमवती अमावस्या यात्रा विशेष असणार आहे. जेजुरीत विविध भागांतून भाविक भक्त मोठ्या संख्येने खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.