शिरवळः खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत वसलेली आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे जाळे या भागात निर्माण झाले आहे. मात्र, शिंदवाडीनजीक असलेल्या काही कंपन्याने केमिकलयुक्त पाणी ओढ्याच्या माध्यमातून तलावात सोडून नैसर्गिक स्रोत बुजविण्याचे काम कंपनीने केले असून त्या ठिकाणी अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या दुषित केमिकलयुक्त पाण्यामुळे पाण्याच्या नैसिर्गिक स्रोतांवर बाधा आली असून तलावात येणाऱ्या दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच ओढ्याच्या माध्यमातून तलावात येणारे पाणी अतिशय दुषित स्वरुपाचे असून काळसर रंगाचा थर या पाण्यावर दिसत आहे.
मात्र, संबंधित कंपनीने ग्रामस्थांनी केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी गावकऱ्यांनी व गावच्या सरपंचांनी संबंधित ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी अनिता मळेकर (सरपंच शिंदेवाडी), युवराज सोनवणे (ग्रामस्थ), डॉ. राजेंद्र जाधव, काकासाहेब सोनवणे, राजेंद्र सोनवणे, अनिकेत सोनवणे, अमित सोनवणे, श्रीकांत जाधव, अक्षय सोनवणे, अविनाश सोनवणे, अंबादास सोनवणे, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.
नेमकं प्रकरण काय ?
खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीजवळ १९७२ साली पाच तलाव बांधण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून केमिकलयुक्त पाणी यापैकी एका तलावात सोडण्यात येत आहे. तसेच कंपनीने या ठिकाणी अतिक्रमण करुन नैसिर्गिक स्रोत नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंपनीने अनधिकृतरित्या या ठिकाणी बांधकाम केले आहे. पूर्वीपासूनच या तलावाच्या माध्यमातून जनावरांना पिण्याचे पाणी दिले जाते. अशा प्रकारे केमिकलयुक्त पाणी तलावात आल्याने हे पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करु शकते. तसचे जनावरांच्या आरोग्यचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनीने मात्र ग्रामस्थांनी केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
कंपनीचे म्हणणे काय ?
या संपूर्ण प्रकारावर संबंधित कंपनीने पत्र जारी केले असून, ग्रामस्थांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार कंपनीतील रसायनयुक्त पाणी प्रक्रियेसाठी कंपनीचा स्वतंत्र प्लाँट कार्यरत आहे. यामुळे कंपनीने कोणत्याही प्रकारचे पाणी उघड्यावर सोडलेले नाही. पाझर नावाचा कोणताही तलाव येथे नसून बंधारे बुजविण्याचा केलेला उल्लेख चुकीचा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या जागेत कोणत्याही प्रकाराचा बंधारा अस्त्विवात नसून ज्या ठिकाणी बंधारा आहे त्या ठिकाणी कंपनीची जागा नाही. असे देखील पत्रात नमूद केले आहे.
कंपनीच्या एकमेकांवर रोख
संबंधित ओढ्याच्या माध्यमातून सोडण्यात आलेले दुषित पाणी आमच्या कंपनीचे नसल्याचे सांगण्यात येत असून इतरही कंपन्यांनी काढता पाय घेत आमचे हे पाणी नसल्याचे सांगितले आहे. यामुळे या केमिकलयुक्त पाण्यामुळे संबंधित कंपन्या चालढकल करीत एकमेकांवर रोख करताना दिसत आहेत.
१९७२ साली एकूण पाच तलाव येथे बांधण्यात आले. त्यातला हा एक तलाव आहे. या तलावाचे पाणी शेतीसाठी वापरण्यात येते. तसेच पिण्यासाठी देखील या पाण्याचा वापर केला जातो. या तलावात दुषित पाणी सोडल्याने तलावाच्या येथे अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे हे दुषित पाणी आरोग्यासही हानीकारक बनले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीसोबत पत्रव्यवहार केला होता. त्यावर त्यांना आम्ही सांगितले होते की, तुम्ही तलाव चुकीच्या पद्धतीने बुजविला आहे. त्यांचे पत्र आले की, या जागेवर तलावच नव्हता.
-अनिता मळेकर (सरपंच, शिंदेवाडी)