जेजुरी: प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे
कोकणची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून रोहा नगरीची ओळख आहे. येथील पवित्र खळखळत्या कुंडलिका नदीच्या तीरावरील पुण्यातील ख्यातेनाम शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलाकृतीतून पुर्वमुखी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 43 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण अनावरण सोहळा लवकरच होणार असून, या भव्य दिव्य व देखण्या पुतळ्याच्या निर्मितीकरिता खासदार सुनील तटकरे यांनी विशेष परिश्रम घेतले असून, या पुतळ्याच्या आगमनाची भव्य मिरवणूक रोहा नगरीत काढण्यात आली .
यावेळी बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मिरवणूकीत सर्व नागरिकांनी सहभाग घेतला होता. रोहा नगरपरिषदेमार्फत पुतळा आगमना वेळी संपूर्ण शहराच्या चौकाचौकातून पुष्प वर्षाव करण्यात आला. तर विविध चित्ररथांचे आयोजन देखील केले होते. विविध भागातून झांज पथके देखील उपस्थित होती. पुण्यातील कलासंस्कार आर्ट स्टुडिओचे पुरंदरचे जेजुरी येथील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी आजवर अनेक शेकडो महान महापुरुषांचे पुतळे निर्माण केले आहेत.
सदर पुतळ्याचे वजन साडे आठ टन असून याच्या मजबूत कामाकरिता टाटा स्टीलच्या अंतर्गत आवरण करण्यात आले आहे. कोकण रोहा येथील भौगोलिक परिस्थिती तथा शास्त्रीय अभ्यास करूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निर्मिती करण्याकरिता दीड वर्षाचा कालावधी लागला. खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी वारंवार भेटी देवून पुतळा शिवस्मारक निर्मिती कामावर लक्ष दिले.
एक दिवस एक रात्र स्ट्रक्चर इंजिनिअर आणि संबंधित तज्ञांची टीम उपस्तिथ होती. शिल्पकार महेंद्र थोपटें यांच्यासह चित्रकार, मूर्तिकार अनिकेत देशमुख, चित्रकला अभ्यासक सुरेंद्र कुडपणे, धनंजय कोटकर, सचिन घागरे यांनी पुतळा सेट करण्यात परिश्रम घेतले. काही दिवसातच या शिवस्मारकाचे अनावरण करण्यात येणार असल्याचे स्मारक समितीच्या वतीने सांगण्यात आले. खरे तर थोपटें यांनी शेकडो भव्य अशा पुतळ्यांची निर्मिती केली असून त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
नुकत्याच घडलेल्या छत्रपती शिवाजी पुतळा दुर्घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले असून, कोणत्याही महापुरुषांच्या प्रतिमेच्या निर्मितीत तंत्रज्ञान इतिहास अभ्यास दीर्घकाळाचा अनुभव आणि भौगोलीक परस्तिथीचे निरीक्षण आणि श्रद्धा व अस्थेचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.