राजगड: वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील निलंबन केलेल्या ग्रामसेवकावरील निलंबन कार्यवाही रद्द न करता ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ग्रामस्थ शंकर चाळेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये एकाच मालमत्तेची दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे नोंद करणे, विकानिधी खर्च करताना स्वतः ठेकेदारी करून देवस्थानच्या जागेत अतिक्रमण करून निधी खर्च करणे या आणि अशा अनेक तक्रारी करत वेल्हे बुद्रुक येथील ग्रामस्थ शंकर चाळेकर व प्रमोद भोरेकर यांच्यासह काही ग्रामस्थांनी २५ जानेवारी २०२४ रोजी पंचायत समिती कार्यालय येथे उपोषण केले होते.
चौकशी केली असता कामामध्ये आढळून आली अनियमितता
दरम्यान, गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी विस्ताराधिकारी कृषी पंचायत समिती यांच्यामार्फत चौकशी केली असता, कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने ग्रामसेवक नितीन नारायण भालेराव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याबाबतचे पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. यानंतर ग्रामस्थ शंकर बबन चाळेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २० मे २०२४ रोजी पत्रव्यवहार करत ग्रामसेवक भालेराव यांची निलंबनाची कार्यवाही रद्द न करता ग्रामपंचायत कमिटी यांनी केलेले कामकाज आर्थिक गैरव्यवहार हे माफ करण्यायोग्य नाहीत म्हणत ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करावी. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.
जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) अनुषंगाने अहवाल मागविण्यात आलेला आहे. तो लवकरच पाठविण्यात येणार आहे.
गटविकास अधिकारी पंकज शेळके