जेजुरी: येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहायला लागू नये, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोस्टल वोटिंग म्हणजेच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वी ईव्हीएम प्रशिक्षणा दरम्यान टपाली मतदान कक्ष प्रशिक्षणाच्या ठिकाणी उभारण्यात आला होता. त्यावेळी 234 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आता नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, सासवड या ठिकाणी स्वतंत्र टपाली मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली असून, निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे.