भोर : तालुक्यातील रोजगार आणि अर्थचक्राला नवसंजीवनी देणारी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. अनेक वर्षे बंद पडलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्यास राज्य शासनाने हमी दिल्यामुळे यंदाच्या हंगामात गाळप हंगाम सुरळीत सुरू राहणार असून पुढील वर्षी कारखान्याचे व्यापक नुतनीकरण होणार आहे. ही माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी बुधवारी (दि. २७) रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके, संचालक विकास कोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब गरुड, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, उत्तम थोपटे, रविंद्र कंक, शिवनाना कोंडे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, सुरेखा निगडे, समीर घोडेकर, आबा शेलार, अभिषेक येलगुडे, शंकर मालुसरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी, कामगार व संचालक उपस्थित होते.
थोपटे म्हणाले, “राज्य सरकारने राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी), नवी दिल्लीच्या माध्यमातून ४६७.७५ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यातून शेतकरी व कामगारांची देणी फेडणे, खेळते भांडवल आणि कारखान्याच्या नव्या प्रकल्पांसाठी निधी मिळणार आहे. यात ३५०० मेट्रिक टन गाळप क्षमतेचा प्रकल्प, ६० केएलपीडी डिस्टीलरी, १२ मेगावॅट सहवीज प्रकल्प आणि ५ टन क्षमतेचा सीएनजी गॅस प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीस चालना मिळणार असून भोर-राजगड तालुक्याच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार आहे.”
यामुळे शेतकरी व कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असून गणेशोत्सवाच्या पर्वात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. थोपटे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेच कारखान्याचे भवितव्य उज्ज्वल झाले आहे. रोजगार, शेतकरी हित आणि ग्रामीण विकासाला चालना मिळावी या दृष्टीने शासनाने हिरवा कंदील दिला आहे.”
यावेळी राज्य शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहूल कुल यांच्यासह संबंधित विभागीय अधिकाऱ्यांचे शेतकरी व सभासदांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. पत्रकार परिषदेनंतर रायरेश्वर कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून शेतकरी व संचालकांनी जल्लोष साजरा केला.
मुख्यमंञ्यांच्या हस्ते भूमिपूजन
राजगड साखर कारखान्याचे नुतनीकरण आणि नवीन प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. यामुळे शेतकरी व कामगारांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट – उपाध्यक्ष पोपट सुके
“कारखाना हा माझा नसून सभासद, शेतकरी व कामगार यांचा आहे. राज्य सरकारने घेतलेली कर्जहमी ही शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट आहे. यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेला रोजगार पुन्हा फुलणार आहे,” असे उपाध्यक्ष पोपट नाना सुके यांनी सांगितले.