भोर : आपण जिथे काम करतो, दिवस-रात्र एक करुन मेहनत करतो, संघर्ष करतो तिथल्या वरिष्ठांनी आपल्याला अशा पद्धतीने आपला सत्कार करणं, यापेक्षा मोठा सन्मान काय असेल…आपल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतर सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अशाप्रकारे केलेल्या सन्मानाने अंकुश खोमणे हे अत्यंत भारावून गेले.
राजगड पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले अंकुश खोमणे हे आज जवळपास 36 वर्षांनंतर पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचं आज बळीराजा मंगल कार्यालय किकवी या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अत्यंत आगळंवेगळं स्वागत झालं. एवढंच नव्हे तर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सेवानिवृत्त झालेल्या अंकुश खोमणे यांना आपल्या गाडीत बसवलं. त्यानंतर साहेबांच्या गाडीची सफर घडवत खोमणे यांना त्यांच्या घरी सोडलं.
नोकरीवर असताना प्रामाणिक काम करणाऱ्या खोमणे यांना गाडीत बसवून त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज स्वतः त्यांचाच सन्मान केला. यापेक्षा मोठा क्षण कोणता असेल? आपल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतर सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अशाप्रकारे केलेल्या सन्मानाने अंकुश खोमणे हे अत्यंत भारावून गेले. त्यांचे कुटुंबीयदेखील त्यावेळी उपस्थित होते. खोमणे यांचे डोळे सारं काही सांगत होते.
अंकुश खोमणे हे जवळपास ४ वर्षांपासून राजगड पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. मात्र, आज ते सेवानिवृत्त झाले. सध्या पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे देखील राजगड पोलीस ठाण्यात मागील ३ महिन्यांपासून कार्यरत आहेत. या कार्यक्रमावेळी राजगड पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.