जेजुरीः शहरातील विविध विकास कामे व भूमीपूजनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मल्हार नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले. सुसज्ज व अत्याधुनिक मल्हार नाट्यगृह आणि आर्ट गॅलरीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये शासकीय विश्रामगृह, भाजी मंडई, मोरगाव-निरा बायपास रस्ता, अहिल्यादेवी होळकर तलाव येथील उद्यानाचा पहिला टप्पा, जेजुरी एसटी स्थानक, डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला जेजुरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात एखादे नाट्यगृह असावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मल्हार नाट्यगृह व आदी विकास कामे झाली आहेत. तब्बल ९ कोटी ३७ लाख रुपये खर्चून मल्हार नाट्यगृह व आर्ट गॅलरी उभी राहिली आहे. या नाट्यगृहाची आसनक्षमता ३७० असून, सदर काम हे नगरोत्थन योजनेतून पूर्ण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लावणीसम्राज्ञी लीला गांधी या देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. मल्हार नाट्यगृहामुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून, त्यांना कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्तिविक मा. नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी केले.
यावेळी भाषणात शरद पवार म्हणाले की, जेजुरी हे अंखड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून, ही एक कलाकारांची नगरी आहे. या नगरीने अनेक लोककलांवत महाराष्ट्राला दिले आहेत. पुरंदर तालुका आणि जेजुरीला खूप मोठा ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त जेजुरीत दाखल होत असतात.
पुण्याची नवी ओळख कोयता शहर
गेल्या काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एकीकडे लाडकी बहिण म्हणायचे आणि दुसरीकडे दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. पुण्याला खरेतर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखळी जाते मात्र, आता पुण्याची ओळख ही कोयता शहर म्हणून झाल्याचे पवार यांनी सांगितले.