जेजुरीः येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत संत सोपान काका यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे यांंच्या प्रचारार्थ सासवड येथील पालखी तळावर भव्य सभेला संबोधित केले. महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारेच असून, बापूचा विजय हा काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचे उद्गार शिंदे यांनी यावेळी बोलतान काढले. तसेच कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधकांच्या हाती ही जागा जाता कामे नये, असे देखील ते यावेळी म्हणाले. निवडणुकीच्या रिंगणात बापूसारखा खंदा शिलेदार मैदानात असल्याने पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारेच होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
आमदार नसताना देखील बापूंनी विरोधकांशी कडवी झुंज देत भगवा फडकविण्याचे काम केले आहे. यामुळे आता पुढील काळात देखील भगवा कायमस्वरुपी फडकत ठेवण्याचे काम करायचे आहे. विजय सोपान शिवतारे या नावावरून अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अग्नीपथ सिनेमातील मेरा नाम विजय दिन्नानाथ चौव्हान हा डॅायलॅाग आठवल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. विजय सोपान शिवतारे नक्कीच पुरंदर विधानसभेत विजयाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. बापू यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असून, काम कसे करवून घ्यायचे याची माहिती त्यांना आहे. यामुळेच तर त्यांनी आमदार नसताना देखील या मतदार संघात विविध विकास कामे करण्याचे काम केले असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी शिवसेनेचे रमेश कोंडे, मा. आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पश्मिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, पुरंदर विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव, भाजपचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, शालिनी पवार, अतुल मस्के, दत्तात्रय काळे, युवासेनेचे अॅड. नितीन कुंजीर, मंदार गिरमे, महिला आघाडीच्या ममता शिवतारे, भाजपच्या मंगल पवार आदी महायुतीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
रोजगारामध्ये भूमिपत्रांनाच संधी मिळणारः शिंदे
फुरसुंगी उरळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेसाठी त्यांनी पाठपुरावा केला. जेजुरी शहरासाठी ७८ कोटी रुपयांची विकासकामे, जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या विकासकामाकरिता ३४९ कोटी रुपयांची कामे, रखडलेले गुंजवणी पाणी योजना, लॅाजिस्टिक हॅबसाठी २५० कोटी रुपयांच्या तरतूद, आतंरराष्ट्रीय विमानतळामुळे आजूबाजूच्या परिसराचा विकास होणार असल्याची माहिती यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या ठिकाणी होणाऱ्या विकासातून निर्माण झालेल्या जागांवर भूमिपूत्रांना काम देणार असल्याचा शब्द शिंदे यांनी पुरंदच्या जनतेला दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील चर्चेतील प्रश्न
- पुरंदर उपसा सिंचनाचे तेनतेरा
- गुंजवणी पाण्याची योजना
- आतंराष्ट्रीय विमानतळ
- तालुक्यातील अनेक भागांत पाण्याची कमतरता