भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पांडुरंग किसन मोरे आणि कोमल पांडुरंग मोरे (दोघेही रा. मोरवाडी ता. भोर) अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या अपघाताबाबात अधिकची माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावर पांडुरंग मोरे हे दुचाकीने प्रवास करत असताना त्यांच्या मागून आलेल्या स्विफ्ट गाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरील पांडुरंग मोरे आणि कोमल मोरे हे दोघेही खाली पडले. चारचाकीच्या बोनेटला ही दुचाकी अडकली. असे असतानाही कारचालकाने कोणताही विचार न करता त्या दुचाकीला तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत फरपटत नेले. ही बाब रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी त्यांनी करचालकास रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने कुठेही लक्ष न देता त्याचे वाहन भरधाव वेगाने वाहन चालवित होता. यावेळी प्रवासी व राजगड पोलिसांनी कारचा पाठलाग करून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, करचालकाने कार महामार्गावर उभी करून घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.