नसरापूरः विशाल शिंदे
पुणे-सातारा महामार्गावर शिवरे व खेड-शिवापूर येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच वाहतूक पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी येथे निर्माण होऊन वाहनाच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहिला मिळाले. चुकीच्या पद्धतीने सुरु असलेले रुंदीकरण, रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, संथगतीने होणारी उड्डाणपुलाची कामे यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी येथील महामार्गावर होताना दिसत आहे. यामुळे या सर्व प्रकारावर नागरिक व प्रवाशी रोष व्यक्त करीत असून, काम करणाऱ्या ठेकेदारावर संताप व्यक्त करीत आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या तब्बल ३ तीन किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांवर वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली. या ठिकाणी होत असलेल्या कामांत नियोनज नसल्याने तसेच काम करणारा संबंधित ठेकेदार याकडे लक्ष देत नसल्याचे नागरिक व प्रवाशांचे म्हणणे आहे.
स्थानिक, युवकांकडून कोंडी सुरळीत करण्यासाठी मदत
शिवरे व खेड-शिवापूर येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्थानिक रहिवाशी व युवक मदत करताना दिसत आहेत.
ठेकेदारावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावीः प्रवाशांची मागणी
काम करणाऱ्या ठेकेदाराकडून सतत कामात चुकारपणा होत असल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचण्यात विलंब होत आहे. यामुळे संबधित ठेकेदारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून प्रवाशांची सुटका करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.