पारगावः गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव आणि खेड येथील मंदिरात चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यातील तपास वेगवान गतीने सुरू करण्यात आला. त्या दृष्टीने या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस पथकातील पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, पोलीस कॅान्स्टेबल संजय साळवे, मंगेश अभंग यांनी संबधित भागात असणाऱ्या पोलीस स्टेशन हद्दीतील सीसीटीव्ही फोटोजची पडताळणी करण्यास सुरूवात केली. या पडताळणीमध्ये एका सीसीटीव्ही फोटोजमध्ये पोलिसांना एक अज्ञात व्यक्ती चोरी करताना आढळून आली. त्या नुसार संबधित व्यक्तीची माहिती मागविण्यात आली. या माहितीमध्ये संबधित व्यक्तीचे नाव विनायक दामू जिते असून, हा सराईत गुन्हेगार असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिक्रापूर येथून ताब्यात घेऊन अटक केली.
जिते हा शिक्रापूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी विनायक जिते हा पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला. सुरुवातीला जिते हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता, त्याला पोलिसांनी विश्वासात घेत चौकशी केली असता, त्याने मंदिरात चोरी केल्याचे कबुल केले. त्याला पोलिसांनी दि. ३१ रोजी अटक करून पोलीस कस्टडीत असताना त्याच्याकडून त्याने चोरी केलेल्या मंदिरांचे नाव विचारण्यात आली. या चौकशीत जिते याने आंबेगाव, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर आणि खेड येथील मंदिरात रात्रीच्या वेळी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. जवळपास या चोरट्याने ११ मंदिरातील देवीदेवतांचे मुखवटे, सोने, चांदी, इलेक्ट्रॅानिक वस्तूंचा समावेश आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील देखील तीन मंदिरांमध्ये चोरी केली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण मिळून तीन लाख बैयन्यू हजारांचा मुद्देमाल कारवाईमध्ये जप्त केला आहे. यामध्ये देव-देवतांचे मुखवटे, सोने, चांदीच्या वस्तू, इलेक्ट्रॅानिकच्या वस्तू आदींचा समावेश आहे. सदरची यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, पोलीस कॅान्स्टेबल संजय साळवे, मंगेश अभंग, पुणे गुन्हेशाखेचे मंगेश थिगळे, चंद्राकांत गव्हाने, अविनाश कालेकर, अजित मडके यांनी केली आहे.