पुणेः पुण्यात प्रवाशांना हत्याचाराचा धाक दाखवून पैसे लूटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परगावाहून आलेल्या प्रवाशांना रिक्षात घेऊन रिक्षा वाटेत थांबवून हत्याराच्या धाकाने पैसे, दागिने, मोबाईल आदी वस्तूंची लूट करण्यात येत होती. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळतील चोरट्यांना गजाआड केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तब्बल १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा छडा लावला. रोहित सुभाष चव्हाण (वय २३, रा. गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) हा रिक्षाचालक व त्याचे साथीदार मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय १९, रा. मंतरवाडी, देवाची ऊरुळी) आणि सुदर्शन शिवाजी कांबळे (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सदर कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे व पथकातील उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, टोणपे यांनी केली.
.
स्वारगेट पीएमपी बस स्टँडपासून एका तरुणाला रात्री साडेनऊच्या सुमारास इच्छितस्थळी सोडण्यासाठी रिक्षाने घेतले होते. मात्र, रिक्षा काही अंतरावर गेल्यावर चालकाने फोन करायचा म्हणून त्याच्याकडील मोबाईल घेतला. रिक्षा पर्वती इंडस्ट्रीज जवळील आल्यानंतर रिक्षा तरुणाने सांगितल्या नुसार न घेता लुल्लानगर परिसरात नेण्यात आली.
त्या ठिकाणी या प्रवाशी तरुणाकडील ५०० रुपये तसेच गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच ४ हजार रुपये ऑनलाईन मागवून घेऊन मोबाईलचा पासवर्डने तेही पैसे ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणावरून आरोपींचे पितळ उघडे पडले आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून संशियत आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी रोहित चव्हाणला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. तसेच साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर सिंहगड रोड, बंडगार्डन, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ व स्वारगेट पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्ह्याची नोंद असल्याचे तपासात पोलिसांना निष्पन्न झाले आहे.