शिक्रापूर/ शेरखान शेख
सणसवाडी येथे भाजी घेण्यासाठी दुचाकीहून आपल्या मित्रासह मित्राच्या दोन मुलींना घेऊन आलेल्या एका व्यक्तीचा दुचाकीला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती धडक बसलेल्या कंटेनरखाली गेल्याने शारदानंद ब्रिजकिशोर तिवारी या व्यक्तीचा या अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये त्याच्या मित्राच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे-नगर महामार्गालगत शारदानंद तिवारी हे त्यांच्या दुचाकीहून त्यांचे मित्र भोला शर्मा यांच्या दोन लहान मुलींसह गेलेले असताना, सणसवाडी येथे भोला शर्मा भाजी घेण्यासाठी दुचाकीहून खाली उतरले होते. तर शारदानंद तिवारी हे दोन मुलींसह दुचाकीवर बसलेले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली.
यावेळी दुचाकीसह तिवारी व दोन मुली कंटेनरच्या चाकाखाली आल्या. या अपघातामध्ये शारदानंद ब्रिजकिशोर तिवारी (वय ४५ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. आझादनगर ता. भुली जि. धनबाद झारखंड) यांचा जागीच मृत्यू झाला असून, भोला शर्मा यांच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर याबाबत रंजन राजवंश पाठक (वय ३३ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. आझादनगर ता. भुली जि. धनबाद झारखंड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अतुल पखाले हे करत आहे.