पुणे: शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. शुल्लक कारणांवरून कोयत्याने वार करून खून करण्यात येत आहे. कालच वडगाव मावळमध्ये एका हॅाटेलमधील वेटरला मारहाण केल्याच्या रागातून हॅाटेल मालकाने दोघांवर कोयत्याने वार केले होते. या घटनेत त्यातील एकाच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पैशाच्या व्यवहारावरून हवेली परिसरात चौघांनी एका तरुणाची भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणाचा फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठलाग करीत चौघांनी तरूणावर कोयत्याने वार करून हत्या केली. सतीश थोपटे (वय ३४, रा. कोल्हेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयत सतीश आणि यातील एका आरोपीची ओळख होती. सतीशने फ्लॅट खरेदी करण्यासाठी २५ लाख रुपये यातील एकाने दिले होते. हा व्यवहार नेमका व्याजाने झाला होता का, की हात उसने म्हणून पैसे दिले होते, याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. त्याचा तपास पोलीस करीत आहेत. या पैशांवरूनच त्यांच्यात काही वाद झाले होते. त्यातूनच कोल्हेवाडी येथे भरदुपारी चौघांनी सतीशला गाठले. त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. हा हल्ला होताच सतीशने त्यांच्या तावडीतून पळ काढला. तेव्हा आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घूनपणे खून केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.