जेजुरीः मयुर कुदळे
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जेजुरी ग्रामीण रुग्णालय आणि जिजामाता ज्युनिअर कॉलेज जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरून समाज प्रबोधनपर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. एड्स या आजाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी ही रॅली महत्त्वपूर्ण ठरली. या रॅलीमध्ये एचआयव्ही, एड्स आजाराविषयी जागरूकता निर्माण करणारे फलक आणि घोषवाक्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
यावर्षी जागतिक एड्स दिनाची थीम “हक्काचा मार्ग, माझे आरोग्य, माझा हक्क” यावर आधारित होती. या थीमच्या अनुषंगाने नागरिकांना एड्सबाबत योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप साळवे यांच्या मार्गदर्शनानुसार एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन करून अपंग दिन, डोळे शस्त्रक्रिया कॅम्प या निमित्ताने देखील उपस्थितांची आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन, जेजुरी परिसरातील बस स्थानक, रिक्षा स्टँड मधील प्रवासी वर्ग, कॉलेजमध्ये या आजारांबाबत माहिती, संक्रमणाचे मार्ग, प्रतिबंध, उपचार, कायदे, हक्क आणि अधिकार याबाबत जनजागृती करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयात मृत्यू पावलेल्या नागरिकांना रांगोळी काढून कॅन्डल लाईट व्हिजनद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रताप साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर लामतुरे, डॉ. मनोहर सोनवणे, दंत चिकीत्सक डॉ. महेश मसराम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सागर माने, मोनाली कदम, औषध निर्माण अधिकारी हितेश गायकवाड, समुपदेशक सुरेखा काकडे, निलेश शेजवळ, शितल बारवकर, विजय पवार, प्रशांत वाल्हेकर, आरोग्य सेवक संजय रोटे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. या सप्ताहासाठी जेजुरी पोलीस स्टेशन, जिजामाता हायस्कूल यांचे विशेष सहकार्य लाभले.