पिरंगुटः मुळशी तालुक्यातील पिरंगुट किराणा मालाचे दुकान असलेल्या मालकाला पत्रकार असल्याची बतावणी करीत खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी साते ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पौड पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पत्रकार असल्याची बतावणी करून बोगस ओळखपत्र दाखवून खंडणीची मागणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी हिमांशू दुबे, विजय झा, रोहीन केदारसिंग पटेल (सर्व रा. कळवा, ठाणे), जितेंद्र कमलाशंकर शर्मा (रा. नालासोपारा, ठाणे) यांना अटक केली आहे. याप्रकरणी इमामुद्दीन गफूर खान (वय-३४, रा. पिरंगुट, ता. मुळशी, मूळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.
पत्रकार असल्याची केली बतावणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमामुद्दीन खान यांचे पिरंगुट कॅम्प भागात किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी हिमांशू दुबे, जितेंद्र शर्मा, विजय झा व रोहीन पटेल हे खान यांच्या दुकानात आले. त्यांनी आम्ही ठाण्यातील कळवा येथील हमारा फाउंडेशनमधून आलो आहोत, असे सांगितले. त्यांनी खान यांना पत्रकार व एनजीओची बोगस ओळखपत्रे दाखवली.
खंडणीची मागणी अन् धमकी..
दुकानातील मालाची तपासणी करायची असून त्यातील गुटख्याचा माल बाहेर काढण्यास सांगितला. नाहीतर आम्ही तुझी तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तुझे दुकान सील करून तुला तुरुंगात पाठवतो, अशी भीती देखील देण्यात आली. यानंतर हे प्रकरण मिटवायचे असेल तसेच पोलिसांत तक्रार करायची नसल्यास दहा लाखांच्या खंडणीची मागणी त्यांनी दुकान मालकाकडे केली. तडजोड करून त्यांनी अडीच लाखांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.