फलटणः कुरण बेट सरडे या ठिकाणी नीरा नदीपात्रात काल सकाळपासून अडकलेल्या लोकांची स्थानिक मच्छिमार व गावकरी यांच्या मदतीने सुटका करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पाण्याच्या विसर्गामुळे बेटाला पडला वेढा
सरडे तालुका फलटण येथील नीरा नदी पत्रात कुरण नावाचे बेट आहे. रात्री नदीपात्रात ६३ क्युसेग वेगाने वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे बेटाला पाण्याचा वेढा पडला होता. त्या ठिकाणी ३ गुराखी सायंकाळी जनावरे चरण्यासाठी गेले होते. रात्री ९ वाजता बेटाला पाण्याचा वेढा पडल्याने गुराखी अडकून पडले होते. रात्री ११ वाजल्यापासून त्या ठिकाणी पाहणी केली असता, काटेरी झाडे असल्याने बोट तिथे गेली नाही. सकाळी तहसीलदार, एनडीआरएफ दल, जलसंपदा विभाग यांना संपर्क केल्यानंतर बचाव कार्यला सुरुवात झाली. ड्रोनच्या मदतीने शोधकार्य सुरु होते. तसेच पाण्याचा विसर्ग कमी करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर जाण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ड्रोनद्वारे पाहणी
सकाळी ड्रोनने पाहणी केली असता बेटावर ३ लोक सुरक्षित दिसत होते. तसेच जनावरे सुध्दा सुरक्षित दिसत होती.
यामध्ये सोपान संभाजी बंडलकर (वय ७०), शंकर अप्पा घोलप (वय ७०), पोपट सदाशिव चव्हाण (वय ६५) सर्व राहणार सरडे तालुका फलटण बेटावर अडकले होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जयपत्रे, हवालदार ओंबासे काकडे, मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांनी उपस्थित राहून सुटकेसाठी प्रयत्न केले.