पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे
दौंड तालुक्यातील पारगांव येथील नाव्हरा ते चौफुला महामार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण गेली अनेक महिने पारगांव येथून जाणाऱ्या मुख्य चौकातील रस्त्यावर मधोमध खड्ड्याचे साम्राज्य असून, यामुळे खड्ड्यात पाणी साचत आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची, ऊस वाहतूकीची ट्रॅक्टरची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असते. मुख्य चौकातील रस्त्याचे काम स्थानिक ग्रामस्थ व केंद्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या वादात रखडलेले असले, तरी या मुख्य चौकातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि घसरड्या रस्त्यामुळे मोठे अपघातही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच या मुख्य चौकामधील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी घसरून पडत आहेत. मुख्य चौकात कसलाही सुरक्षित दिशादर्शक फलक नसून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. तसेच मुख्य चौकातून नानगावला जाणाऱ्या बाजूसही मोठे खड्डे आणि राडारुडा झाला आहे. तर हा वाद मिटेल तेव्हा मिटेल परंतु आम्हाला वाहतुकीला एका बाजूने पर्यायी सुरक्षित रस्ता खुला करून द्यावा अशी पारगाव ग्रामस्थ व प्रवास करणाऱ्या नागरिकांच्यातून बोलले जात आहे. पारगाव चौकामधील बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेत खरेदीसाठी पंचक्रोशीतून लोक येत असतात. परंतु, मुख्य चौकात प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे , झालेली वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी मुख्य चौकातील रखडलेले काम त्वरित पूर्ण करून प्रवाशांना वाहतुकीसाठी रस्ता लवकरात लवकर खुला करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे .