पारगांव: धनाजी ताकवणे
दौंड तालुक्यातील पारगाव येथे सोमवार दि. ६ डिसेंबरपासून ते १३ डिसेंबरपर्यंत श्री सालू-मालू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन नंतर दरदिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब ताकवणे यांनी दिली.
पारगाव येथील श्री सालू मालू मंदिरात हा हरिनाम सप्ताह पार पडेल. ६ डिसेंबर या दिवशी ह.भ.प हनुमंत महाराज मारकड, ७ डिसेंबरला ह.भ.प संग्रामबापू भंडारे पाटील, ८ डिसेंबर या दिवशी ह.भ.प मिलिंद महाराज ढम, ९ डिसेंबर ह.भ.प दयानंद महाराज कोरेगावकर, १० डिसेंबरला ह.भ.प प्रदीप महाराज नलावडे, ११ डिसेंबरला ह.भ.प सुनील महाराज झांबरे, १२ डिसेंबरला ह.भ.प सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन होणार आहे.
पूर्वीपासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा या गावाला असल्याने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात. आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहात संपूर्ण परिसर हरीनामाच्या जयघोषाने दुमदुमून जातो. कीर्तन मंदिराच्या बाहेरील बाजूस होत असल्याने कीर्तनानंतर सर्वाना दरदिवशी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. पूर्वी पेक्षाही कीर्तनासाठी गर्दीमध्ये मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
यावर्षी गावतील दानशूर व्यक्तींकडून दररोज अन्नदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गावातील सर्व तरुणांनी उत्सव पार पाडण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे एक वेगळे चैतन्य यंदा आले आहे. या उत्सवाची सांगता १३ डिसेंबरला होणार असून काल्याचे कीर्तन ह.भ.प.कविराज महाराज झावरे यांचे होणार आहे. सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ह.भ.प. बबन बापू बोत्रे यांनी केले आहे.