- पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे
भीमा नदीच्या बंधाऱ्यावर मासे पकडताना एक तरुण नदी पात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मुजूरी कामानिमित्त पारगांव येथे आलेला नांदेड येथील तरुण सोनू (वय अंदाजे २८) व त्याचे सोबतचे चार पाच जण दुपारी दोनच्या सुमारास पारगाव येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याजवळ मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी भिमा नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने सोनू भीमा नदीच्या पात्रात वाहून गेला. या घटनेची माहिती केडगाव पोलिसांनी कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या झालेल्या घटनेची माहिती ते घेत आहेत. तसेच वाघोली येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पथकाला देखील पाचारण करण्यात आले असून, युवकाचा शोध घेण्याची मोहिम युद्ध पातळीवरती सुरू आहे.
नुकताच भीमा नदीला मागील काही दिवसांपूर्वी पूर आला होता. या पूराने अक्षरशहा थैमान घातले होते. अजूनही नदी पात्रातील पाण्याचा प्रवाहाची तीव्रता अधिक आहे, अशातच अनेक जण या ठिकाणी मासे पकडण्यासाठी धोका पत्करुन येत आहेत. अशा प्रकारच्या अनेक घटना राज्यातील विविध भागात घडलेल्या आहेत. यामुळे अशा धोकादायक ठिकाणी युवकांने शक्यतो जाऊ नये. सोनूचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.