निराः पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत असलेल्या मुस्लिम दफनभूमी समोर भरधाव एसटी बसने एका १५ वर्षांच्या मुलाला जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघाताच्या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मयत मुलाच्या वडिलांना निरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या अपघातात रोहित राजेंद्र जाधव (वय १५ वर्षे) हा मृत पावला आहे. पोलिसांनी एसटी चालकाला दाब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास रोहित जाधव पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरून पायी घरी जात होता. मुस्लिम दफनभुमी समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या डाव्या बाजूने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या पिंपरी चिंचवड आगाराच्या एसटीनेने रोहितला जोरदार धडक दिली. या अपघातमध्ये रोहितच्या डाव्या हाताला, पायाला, छातीला व कमरेच्या भागाला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.
स्थानिक युवकांनी तातडीने रोहितला लोणंद व नंतर बारामतीच्या सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी बस चालक बसवराज मधुकर बिराजदार रा. खालारी, ता. औसा, जिल्हा लातूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस व ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष
बुधवारी नीरेचा आठवडे बाजार असतो. बाजार तळावर जागा मोकळी असतानाही विक्रेते रहदारीच्या पालखी मार्गावर दुकाने थाटून बसतात. रात्रीच्या आठ वाजेपर्यंत रस्त्यावर नागरिकांची रेलचेल असते. या भागात रस्त्याला उतार आहे, पर्यायाने वाहने वेगात जातात. माध्यमांनी वेळोवेळी हीबाब लक्षात आणून दिली आहे, पण पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.