नीराः पुरंदर तालुक्यात पावसाची संततधार कालपासूनच सुरुच आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये ४३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता नीरा नदीला पूर आला असल्याचे पाहिला मिळत आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे वीर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. तसेच भाटघर धरणातून २३ हजार क्यूसेक वेगाने नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर नीरा देवधर धरणामधून ७५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. गुंजवणी धरणामधून २५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वीर धरणामधील पाणीलोट क्षेत्रामध्ये पाण्याची प्रचंड मोठी वाढ झाली असून वीर धरणाचे नऊही दरवाजे उघडण्यात आलेले आहे.