नसरापूरः येथील एका किराणा मालाच्या दुकानात येवून दोन अज्ञातांनी दुकानातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी मंगल नारायण हाडके वय ७५ यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नसरापूर गावच्या हद्दीत फिर्यादी यांचे एक किराणा मालाचे दुकाना आहे. २३ सप्टेंबरच्या दिवशी दोन अज्ञात इसम दुचाकीवरुन त्यांच्या दुकानात आले. फिर्यादी यांच्याकडील शंभर रुपयाची नोट मंदिरामध्ये दान करण्यास सांगून, “तुम्ही शंभर रुपयाच्या नोटेला सोन्याचा स्पर्श करा, तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी येईल”, असे सांगून फिर्यादी यांच्या हातातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी विश्वास संपादन करुन लंपास केली आहे. त्यानुसार राजगड पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस हवालदार सुर्यवंशी हे करीत आहेत.