नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावर लगत असणाऱ्या गावांमध्ये एकाच रात्रीत तब्बल चार चोरीच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात असणारी दुकाने रात्रीचा फायदा घेत चोरट्यांनी फोडून त्यातील काही रक्कम आणि वस्तू लंपास केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडलेली आहे. ही संपूर्ण घटना यातील एका दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
‘या’ चार ठिकाणी झाली चोरी
नसरापूर येथील पुजारी यांच्या उद्योजक मोबाईल शॉपीमध्ये एका बाजूने शटर उचकटून तीन चोरट्यांनी दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल, ब्लू टूथ व एक नवा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार पुजारी यांनी केली आहे. केळवडे येथील श्रीनाथ डेअरी व केक शॉपमध्येही शटर उचकटून चोरट्यांनी तीन हजार रुपयांसह बिस्किटे व केक चोरून नेल्याचे दुकान मालक ओंकार तानाजी कडू यांनी सांगितले. शिवरे येथील ओमकार मिसळ हाऊसचे शटर उचकटून चोरट्यांनी काऊंटरमधील वीस हजार रुपये चोरल्याची माहिती मिसळ हाऊसचे मालक धनेश डिंबळे यांनी दिली. तर धांगवडी फाटा येथील हॉटेल संकल्पशेजारील पानाच्या टपरीचा दरवाजा उचकटून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काउंटरमधील काही रक्कम चोरून नेल्याचे हॉटेलचे मालक अतुल कामथे यांनी सांगितले.
पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरजः स्थानिकांची मागणी
गुरुवार पहाटे या चोरीच्या घटना घडूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. राजगड पोलिसांची गस्त नसल्याने पुणे- सातारा महामार्ग व परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, जबरी चोरीच्या घटना देखील घडत आहेत. यामुळे पोलिसांनी या भागांत गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.