सुशील कांबळे : राजगड न्युज
वाई प्रतिनिधी: ऊस उत्पादक सभासदांच्या पाठींब्यावर व त्यांना होणाऱ्या त्रासामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक लढविली व जिंकलीही. निवडणुकीपुर्व कारखान्यावर किती आर्थिक बोजा आहे हे फक्त माहित होते. परंतु सुत्रे हातात घेतल्यानंतर प्रत्यक्षात माहिती घेतली असता जी परिस्थिती होती, ती अतिशय भयावह होती. यातून बाहेर पडण्याचा मार्ग विकट असल्याचे समजले. परंतु, सभासदांनी याबाबत कोणतीही शंका मनामध्ये बाळगु नये. आमचे व्यवस्थापन यातून मार्ग काढून किसन वीरवरील सर्व अडचणींवर मात करणार, मात्र यासाठी थोडा अवधी सभासदांनी द्यावा, असे आवाहन किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी काढले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची ५२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी आमदार मकरंद आबा पाटील होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन काका पाटील, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष अनंत तांबे, बावधन सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, नितीन भरगुडे पाटील, बाळासाहेब सोळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, किसन वीर कारखान्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय चांगली आहे. या कारखान्यागत कार्यक्षेत्र महाराष्ट्रामध्ये कोणत्याच कारखान्याकडे नाही. परंतु नियोजन शुन्य कारभार, भ्रष्टाचारामुळे कारखान्यावर आज लिलावाची वेळ आलेली होती. कदाचित निवडणुक लढविली नसती तर कारखान्याचे खाजगीकरण नक्कीच झाले असते व कारखान्याच्या सभासदांचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते. मागील व्यवस्थापनाने सन २०२०-२१ मधील ऊसाच्या बीलाची रक्कमही दिलेली नाही. कामगारांचे पगारही देण्याची त्यांची ऐपत राहिलेली नव्हती. त्याचप्रमाणे व्यापारी देणी, शासकीय देणी सर्वच देणी ठेवलेली होती, यावरून त्यांनी किती मोठ्या प्रमाणात गैरकारभार केलेला आहे, हे दिसून येते. खंडाळा कारखान्यावर आज जवळपास २७८ कोटींची रक्कम देय आहे. मध्यंतरीच्या काळात सरकारमध्ये बदल झाला, याची माहिती आपणांस आहेच. कारखान्याचे हित लक्षात ठेऊनच आज राजकीय स्थलांतर केले. त्यावेळी पहिल्या पाचमध्ये मंत्रीपदाची ऑफर असतानादेखील पहिल्यांदा किसन वीर व खंडाळा कारखान्यास आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करणार नाही तोपर्यंत मंत्रीपदाची शपथ घेणार नाही, असे ठणकावून सांगणारा मी कार्यकर्ता आहे. कारण कारखाना वाचला तर शेतकरी वाचणार आहे. मध्यंतरीच्या काळात किसन वीर व खंडाळा कारखान्यावर राज्य बँकेने जप्तीची ऑर्डर काढलेली होती. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मध्यस्तीनंतर ती कारवाई थांबलेली होती, यानिमित्ताने मी त्यांचे आभार मानतो. गळीत हंगाम २०२२-२३ मधील दोन्ही कारखान्याची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम, व्यापारी देणी इतर सर्व देणी दिलेली असल्यामुळे आपल्यावरील विश्वास वाढलेला दिसून येत आहे. सन २०२०-२१ मधील उर्वरित ऊस बीलेही देण्यात येणार आहेत. परंतु यासाठी सभासदांनी आमच्या व्यवस्थापनास थोडासा अवधी दिला पाहिजे. याबाबत आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. किसन वीर कारखान्याने यावर्षीचे ८ लाख मेट्रिक टन व खंडाळा कारखान्याचे ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दीष्ठ नजरेसमोर ठेवलेले आहे. यासाठी लागणारी तोडणी यंत्रणा व अंतर्गत कामेही झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, किसन वीर ही मातृसंस्था अडचणीत आणून खंडाळा कारखान्यास कर्ज काढून दिले. यामुळे दोन्ही कारखाने आर्थिक अडचणीत आहे. किसन वीरांनी हे सहकाराचे रोपटं लावलेलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. परंतु मागील १९ वर्षांच्या कालखंडात हा वटवृक्ष कोमजलेल्या अवस्थेत आणून ठेवला. मात्र, सभासदांनी किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने आमदार मकरंद आबा पाटील यांच्या व्यवस्थापनाच्या हातात दिल्यामुळे मागील हंगामातील कोणतीही देणी शिल्लक ठेवलेली नाहीत.
नोटीस वाचन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, सरला वीर, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, प्रतापराव पवार, महादेव मसकर, मनोज पवार, सत्यजीत वीर, मोहन जाधव, श्रीकांत वीर, रमेश गायकवाड, पोपट जगताप, मानसिंगराव साबळे, अरविंद कदम, बबनराव साबळे, अॅड. उदयसिंह पिसाळ, मदन भोसले, भैय्यासाहेब डोंगरे, शामराव गायकवड, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, नारायण नलवडे, सुजित जाधवराव, दादासाहेब पवार, दिपक बाबर, नितीन मांढरे, निवास शिंदे, पप्पु हगीर, चरण गायकवाड, ज्ञानेश्वर शिंगटे, शिवाजीराव गायकवाड, नारायण शिंदे, कुमार बाबर, सुरेश बाबर, सयाजी बाबर, संतोष बाबर, चंद्रकांत बावर, तुकाराम बाबर, विकास बाबर बादशाह इनामदार, सर्जेराव पवार, हणमंत शिंदे, दादासाहेब शिंदे, अंकुश निंबाळकर, नितीन निकम, प्रकाश पावशे, सुर्यकांत शिंदे, अंकुश शिंदे, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद शेतकरी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते..
राज्यशासनाचा थकहमीचा निर्णय किसन वीर व खंडाळ्यासाठी महत्वाचा :आमदार मकरंद आबा पाटील
किसन वीर व खंडाळा कारखान्यास कोणतीच बँक एक रूपयाचे कर्ज न मिळता आपण मागील हंगाम आपण दिलेल्या शेअर्स अनामत व ठेवींच्यामुळे सुरू करू शकलो व सर्व देणीही दिली. किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी आपण राजकीय स्थलांतर केले. साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा राज्यशासनाने जो निर्णय घेतलेला आहे, तो किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे. या मिळणाऱ्या थकहमीसाठी आम्ही सर्व संचालकांची आपली सर्व संपत्ती तारण ठेऊनच राज्यशासन आपल्या दोन्ही कारखान्याला थकहमी देणार आहे. त्यामुळे सभासदांनीही आपली मातृसंस्था जपुन व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी आपला संपुर्ण परिपक्व ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच देण्याचे आवाहनही चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी केले आहे.