दत्तनगर परिसरात प्रेमप्रकरणाच्या (Love Affair) संशयावरून चाकूने भोसकून मित्राने मित्राची हत्या केली.
कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथे दत्तनगर परिसरात प्रेमप्रकरणाच्या (Love Affair) संशयावरून चाकूने भोसकून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना घडली यामध्ये ओम श्रीधर देसाई (वय १८, दत्तनगर, बामणोली, मूळ अलकूड (एस) असे मृताचे नाव आहे.
बामणोलीसह (Bamnoli) परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, तिघा संशयितांसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ओंकार नीलेश जावीर (२०), सोहम शहाजी पाटील (२०), रोहित बाळासाहेब केंगार (१९, सर्व दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा देखील यामध्ये समावेश आहे.या प्रकरणी मृत ओमचा भाऊ आदेश देसाई याने फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हल्लेखोर व ओम देसाई सर्वजण दत्तनगर, बामणोली येथील रहिवासी आहेत. एकमेकांसोबत चांगले संबंध होते. ओमचे प्रेमसंबंध असल्याचा संशय ओंकारच्या मनात होता. तेव्हापासून तो खुन्नस देऊन होता. त्याचा काटा काढण्याचा कट मुख्य संशयित ओंकारने रचला.
रात्री जेवण झाल्यानंतर संशयित चौघे एकत्र आले. एकाने ओमला फोन करून घराजवळील परिसरात खुल्या जागेत बोलावले. ओम आल्यानंतर बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यानंतर ओंकारने धारदार चाकूने हल्ला चढवला. पोटाखालील भाग व डोक्यात वार झाल्याने ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला दुचाकीवरून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. उपचार शक्य होणे नसल्याने सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर इजा होऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रेमप्रकरणाच्या संशयावरून खून केल्याची कबुली
दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे व कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली. काही तासांत दोघांना ताब्यात घेतले. कुपवाड पोलिसांनी अन्य दोघांना ताब्यात घेतले. चौघांपैकी एक अल्पवयीन आहे. त्यांनी प्रेमप्रकरणाच्या संशयावरून खून केल्याची कबुली दिली.
न्यायालयापुढे हजर केले असता तिघांना १८ जानेवारीपर्यत पोलिस कोठडी मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. कारवाईत सहाय्यक फौजदार जितेंद्र जाधव, सतीश माने, कुलदीप माने, विजय कोळी यांचा सहभाग होता.
हल्लेखोर घनिष्ठ मित्र
मृत ओम कुपवाड औद्योगिक वसाहतीत काम करत होता. हल्लेखोर ओंकार मोलमजुरीच करतो. मृत व संशयित हल्लेखोर घनिष्ठ मित्र होते. कामावरून आल्यानंतर बामणोलीतील कट्ट्यावर त्यांची उठबस होती. प्रेमप्रकरणाच्या संशयावरून खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र, अठरा वर्षांच्या युवकाला संपवण्यामागे प्रेमप्रकरण इतकेच कारण होते का? आणखी काही कारण आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.
एकच वार वर्मी लागला
ओम देसाई याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोटाखालील भागात एक वर्मी वार झाला होता. तसेच शरीरावर अन्य ठिकाणी भोसकल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल उत्तरीय तपासणीत आला. डोक्यात दगडाने मारहाण केली आहे.