ग्रामीण भागातील जनतेला मोफत व चांगली आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक वर्षांपासून लोणी काळभोर (ता. हवेली) येथे कार्यरत आहेत. या केंद्रामार्फत मोफत औषधे व रक्त तपासणी होत असल्याने शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे एक वरदान ठरले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.
आयुष्मान भव: या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य मेळाव्याचे शनिवारी (ता.२३) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला डॉ. रामचंद्र हंकारे यांनी भेट दिली. यावेळी डॉ. रामचंद्र हंकारे बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.