नसरापूर: राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिअर शॅापी आणि मोबाईल रिपेरिंगची दुकाने फोडण्यात आली होती. या चोरीच्या घटनेने येथे मोठी खळबळ उडाली होती. येथील नागरिकांनी संबंधित चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी राजगड पोलिसांनी टोळतील एका आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील मधुशाला नावाच्या बिअर शॅापीचे तसेच एका मोबाईल रिपेरिंगचे दुकान चोरट्यांनी फोडून काही रोकड व मोबाईची चोरी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दि. १३ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीमार्फत नसरापूर येथील चेलाडी फाट्याजवळ एका इसमाला पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 13 डिसेंबर रोजी राजगड पोलीस पेट्रोलींग करत असताना पोलीस हवालदार अमोल शेडगे व पोलीस शिपाई मंगेश भगत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, संबंधित चोरी करणाऱ्या टोळीतील एक चोर नसरापूर येथील चेलाडी फाटा ब्रिजखाली थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला अटक केली. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना कळवून सदर ठिकाणी वेगवेगळया टिम तयार करून सापळा रचून सदर इसमास रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.
टोळीतील आरोपींचे नावे
करण अजय हुंबे (वय १९ वर्ष रा. अमृत भेळ शेजारी पारी कंपणी चौक ,धायरी, ता. हवेली, जि. पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर त्याने साथदारांची नावे पोलिसांनी सांगितले आहेत. ती पुढीलप्रमाणे राहुल संजय दारवटकर, रोशन राजु लांडगे, लक्ष्मण राम परिवार सर्व राहणार धायरी पुणे यांनी मिळून 3 महिन्यापुर्वी नसरापूर येथील मधुशाला बियर शॉपी येथे रात्रीच्या वेळेस शटर उचकटून कॅश काऊंटरमधील रोख रक्कम ४ लाख १० हजार रुपये चोरुन नेले होते.
तसेच १० दिवसांपूर्वी हुंबे आणि रोशन राजु लांडगे, लक्ष्मण राम परिवार असे तिघांनी मिळून नसरापूर येथील मोबाईल रिपेअरींग दुकानाचे शटर उचकटून मोबाईलची चोरी केली होती. अशी कबुली करण हुंबे याने दिल्याने सर्व आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजीराव बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनी दत्ताजीराव मोहीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस हवालदार राजू मोमीन, अमोल शेडगे, तुशार भोईटे, रामदास बाबर, पोलीस कॅान्स्टेबल मंगेश भगत तसेच राजगड पोलीस स्टेशनचे अजित पाटील, पोलीस शिपाई अक्षय नलावडे, पोलीस शिपाई मंगेश कुंभार यांनी केली आहे.