खंडाळा : तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे झोपलेल्या प्रशासनाला , प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक नायगावला विकासाच्या कामांपासून वंचित ठेवणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी नायगाव ग्रामस्थांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासमोरच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
दरवर्षी सावित्रीबाईंच्या जन्मदिनी मुख्यमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधी करोडो रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा नायगाव येथे येऊन करतात. परंतु त्याच नायगावकरांना चक्क विहीरीच्या पाण्यासाठी आमरण उपोषण करावे लागत आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या घोषणांवर व अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नायगाव तालुका खंडाळा या ठिकाणच्या ग्रामस्थांना ओढ्यातील दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळवली .
नायगाव लगतचे ओढा व बंधाऱ्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने वडगाव पोतनीस नजीक मृद व जलसंधारण विभागाच्या मालकीच्या मांड ओढ्याच्या पात्रामधील जागा पाणीपुरवठ्यासाठी विहिरीस उपयुक्त असल्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी , मृद व जलसंधारण विभाग सातारा यांचेकडून ना हरकत दाखला घेऊन त्या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले.
प्रत्यक्ष विहिरीच्या कामास १२ /०६/ २०२३ रोजी सुरुवात केली होती परंतु दिनांक १४/०६/२०२३ रोजी वडगाव पोतनीस गावातील ग्रामस्थांनी विरोध करून जवळजवळ २८ फुटापर्यंत झालेले विहिरीचे काम बंद पाडून अरेरावी करीत विहीर बुजवली .सदर कामी स्थानिक पदाधिकारी नितीन भरगुडे पाटील यांची फुस असल्याचे नायगाव ग्रामस्थांचे म्हणणे आहे . राजकीय हस्तक्षेपाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा हे सुद्धा वारंवार आपल्या भूमिका बदलत चक्क मुख्यमंत्री महोदयांचे आदेश सुद्धा धाब्यावर बसवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
एकीकडे पाणीपुरवठ्याच्या विहिरीची ही अडवणूक होत असताना नायगाव मध्ये पर्यटन विकास निधीतून होत असणाऱ्या विकास कामांमध्येही समाज कल्याण आयुक्त , मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा हे जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करीत असल्याबद्दल कागदोपत्री पुरावे दाखवत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शासन नियमानुसार विकास कामांचे मंजुरीचे सर्व प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा मार्फत योग्य पद्धतीने राबविली असतानाही समाज कल्याण आयुक्तांना पुढे करून वेगवेगळी कारणे दाखवत सदर विकास कामांना खो घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक चालू आहे.
त्यामुळे पाणीपुरवठा विहीर व समाज कल्याण विभागाच्या मार्फत मंजूर असलेल्या व अर्धवट पूर्ण झालेल्या नायगावातील विकास कामांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थे मुळे व भोंगळ कारभारामुळे आलेली अघोषित स्थगिती उठवून सदर विकास कामे तातडीने चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा लोकशाही मार्ग स्वीकारला असून उपोषणाने तरी झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्न नायगावकर ग्रामस्थांना व परिसरातील जनतेला पडला आहे.