किकवी :भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील नेहमीच चर्चेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, भोंगवली अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र किकवी येथील आरोग्य सेवकाचा नवीनच प्रताप समोर आला असून गैरहजर असून देखील हजेरी पत्रकावर स्वाक्षरी असल्याचा समोर आले आहे. आरोग्य सेवक वारंवार गैरहजर असल्याच्या तक्रारी करत भोर प्रहार अध्यक्ष संतोष मोहिते यांनी निवेदन देत आरोग्य सेवकाची बदली करण्याची मागणी केली असून बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की महेश मारुती कुंभार हे आरोग्यसेवक या पदावर काम करीत आहेत. प्रहार भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांच्याकडे वारंवार या आरोग्यसेवक विषयी तक्रार येत असल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी फोन वरून विचारणा केली असता, मी देवाला गेलो आहे, सर्वे करत आहे अशी चुकीची माहिती देतात.उपकेंद्र किकवी येथे कुंभार येवून सही करून स्वतःच्या कामासाठी जातात व शासनाचा फुक्कटचा पगार घेत असल्याचे आरोप मोहिते यांनी केले आहेत.
शनिवार (दि.२५ नोव्हेंबर) रोजी सकाळी ठिक १०.०० वा. कापूरहोळ गावामधील रूग्न लोहार हे किकवी उपकेंद्रात आले होते. परंतु तिथे आरोग्यसेवक महेश कुंभार हजर नव्हते. लोहार यांनी जवळपास दीड तास वाट पाहून संतोष मोहिते यांस संपर्क करून सदर माहिती दिली. त्यांनी थोड्या वेळात उपकेंद्र किकवी येथे भेट दिली असता त्यावेळी किकवी उपकेंद्र चालू होते. त्या उपकेंद्रामध्ये एक आशाताई वर्कर हजर होत्या व त्या आलेल्या रूग्णांचा बी. पी. तपासत होत्या, संतोष मोहिते यांनी प्रत्यक्ष भेट देवून सर्व पहाणी केली असता त्यात हा प्रकार उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार येणाऱ्या तक्रारी मुळे कुंभार यांची तात्काळ बदली न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पंचायत समिती भोर यांचे कार्यालया समोर दि.१२ डिसेंबर रोजी तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल आणि याच्या होणा-या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
याबत आरोग्यसेवक महेश कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता सुरू असलेले सर्वे करिता बाहेर होतो तसेच डॉक्टरांचा व नर्सिंग स्टाफ चा संप असल्याकारणाने सर्व माझ्या एकट्यावर अवलंबून होते.