खंडाळा, ता.२० : यशवंत सेनेचे (कै) बी. के. कोकरे यांनी धनगर आरक्षणाची ज्योत खंडाळा घाटात पेटवली. या ज्योतीचे वणव्यात रुपांतर करण्याचा निर्णय धनगर समाजबांधवांनी घेतला आहे. एस.टी. प्रवर्गात सामावून घेण्यासाठी आज (ता. २०) पारगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या वेळी धनगर समाजबांधव आपल्या मेंढरांसह रस्त्यावर उतरले होते. येत्या दहा दिवसांत निर्णय न झाल्यास, उजनी धरणात जलसमाधी घेणार असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले.
चौंडी येथील राज्यव्यापी बैठकीत खंडाळा या ठिकाणी ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारा दिवसांपासून चौंडीत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर बांधव एकवटले आहेत. यासाठी रविवारी धनगर समाजातील सर्व आजी, माजी आमदार व सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांची राज्यव्यापी बैठक झाली. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली गेली. खंडाळा येथील पारगाव याठिकाणी आज धनगर समाजाने आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्गावर ‘रास्ता रोको’ केले. या वेळी धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत व्हावी, तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे त्वरीत शिफारस करावी व एस.टी. प्रमाणपत्र त्वरीत मिळावे, मेंढपाळांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, धनगर समाजातील मेंढपाळांना चरण्यासाठी वने आरक्षित करून, पास उपलब्ध करून देण्यात यावा.