जेजुरीः काल दि. २ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचे कुदैवत खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्साहाला सुरूवात झाली आहे. यामुळे मल्हारगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आजचा चंपाषष्ठीचा दुसरा दिवस असून श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी व श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्या वतीने चंपाषष्ठी षडरात्र महोत्सवानिमित्त श्री म्हाळसाकांत हरिद्रामार्चन महापूजा व महाआरती महिलांच्या शुभहस्ते संपन्न झाली. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळपास 551 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या उपक्रमासाठी लिंबराज महाराज देवस्थान, जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान, अखिल मंडई गणपती मंडळ, दिव्यांग प्रतिष्ठान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बालेवाडी यांनीही सहकार्य केले.
शशिकांत व मिलिंद सेवेकरी यांनी सांगितल्या प्रमाणे सर्व महिलांनी हरिद्रामार्चन पूजा केली. तर सुधाकर मोरे यांनी वाद्य सेवा दिली. यावेळी येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात सगळा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सर्व सहभागी महिलांची मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने ओटी भरण करण्यात आले. या उपक्रमासाठी रचना झांजले, स्मिता वाघ, डॉ. भार्गवी बडे, कविता खेडेकर, ज्योती ढमाळ, प्रियंका निकम, संगीता निंबाळकर, मनीषा वांजळे यांनी प्रयत्न केले. मा. नगराध्यक्षा साधना दीडभाई, अमृता घोणे, सुरेखा सोनवणे तसेच माजी आमदार संजय जगताप यांच्या पत्नी राजवर्धिनी जगताप यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ज्योती घाटे यांनी सूत्रसंचालन, मनीषा खेडेकर यांनी प्रास्ताविक, वर्षा थोरवे यांनी आभार व्यक्त केले.
प्रथमच महिलांच्या वतीने अथर्वशीर्ष पठण
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी दरवर्षी ऋषीपंचमीला महिलांचे अथर्वशीर्ष पठण होत असते. तसेच नवरात्रीमध्ये देवीचे कुंकू मार्जन पूजा होते. या दोन्ही उपक्रमाच्या अनुषंगाने खंडेरायाच्या दारातही महिलांकडून महाआरती हरिद्रामार्चन पूजा व्हावी या दृष्टिकोनातून हा संकल्प प्रथमच घेण्यात आला. यासाठी देव संस्थान, ग्रामस्थ व इतर सर्व सेवाभावी संस्थांनी खऱ्या अर्थाने साथ देऊन हा उपक्रम यशस्वी केला, याबद्दल सर्वांचे ऋणी राहील, तसेच दर वर्षी घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी हरिद्रमार्चन महापूजा व महाआरती महिलांच्या हस्ते संपन्न होईल, असे आयोजिका मनीषा खेडेकर यांनी सांगितले.
सेवाभागी संस्थाचाही सन्मान
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग क्षेत्रात सेवाभावे काम करत असलेल्या अनिकेत सेवा भावी संस्था, ब्रम्हदत्त विद्यालय, कलावैभव सेवाभावी संस्था, जीवन साधना फाउंडेशन, मळगंगा अंध अपंग सेवा संस्था व जीवनधारा विद्यालय या सहा संस्थांना खंडेरायाच्या चंपाषष्टी षडरात्री उत्सवाच्या निमित्ताने देवसंस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर व ॲड. पांडुरंग थोरवे व उपस्थित महिलांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिव्यांग क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत असलेले सिने व नाट्य बालकलाकार श्रीश व दर्श खेडेकर यांच्या प्रयत्नातून दिव्यांग मुलांना सहल आणि खंडेरायाच्या दर्शनाची सोय करून देण्यात आली. सर्व उपस्थित महिला व विद्यार्थी यांनी महाप्रसाद घेऊन दिवस आनंदाने साजरा करण्यात आला.