जेजुरीः मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते यांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त अनिल सौंन्दडे यांचा प्रमुख विश्वस्त पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देवकाते यांच्या नावाची निवड मंडळाच्या सर्वानुमते करण्यात आली. देवकाते जेजुरी गडावर येत त्यांनी भंडाऱ्याची उधळण करीत जय मल्हारचा जयघोष करीत देवाचे आशिवार्द घेतला. देवसंस्थानच्या कर्मचारी, सेवकरी, गावकरी, खांदेकरी, मानकरी यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
खंडेराव महाराजांच्या कृपा आशिवार्दाने तसेच विश्वस्त मंडळ, खांदेकरी, मानकरी, गावकरी यांच्या साथीने मला देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्त पदाचा मान मिळाला. सामान्या कुटुंबातील युवक आणि आज देवसंस्थानचा प्रमुख विश्वस्त हा प्रवास माझ्यासाठी संघर्षमय होता. महाराजांची कृपा आणि वाडवडिलांची पुण्याई यामुळे मला आज ही संधी मिळाली. असे देवकाते म्हणाले. तसेच जेजुरीकर, मित्रपरिवार आणि समाजबांधवांचे त्यांनी यावेळी बोलताना आभार मानले.
यावेळी देव संस्थानचे विश्वस्त अड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, डा. राजेंद्र खेडेकर, अनिल सौंन्दडे उपस्थित होते. तसेच जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष गणेश भोसले, उपाध्यक्ष रविंद्र कोषे, सरचिटणीस कल्पेश सूर्यवंशी यांनी देवकाते यांना शुभेच्छा दिल्या.
पुढील काळात देवसंस्थानच्या वतीने विविध योजना राबवायच्या असल्याने त्या बोलण्यापेक्षा मी कृतीमधून करून दाखवेल. यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ मिळावी.
अभिजित देवकाते (श्री मार्तंड देवसंस्थान प्रमुख विश्वस्त)