जेजुरीः येथील एसटी स्थानकामध्ये स्थानकाचा नुतनीकरणाच्या कामचा प्रारंभ झाला आहे. मात्र, या स्थानकामध्ये ६० वर्षांपासून असणारे पिंपळाचे झाड या कामात अडथळा येत असल्याचे कारण देत तोडण्यात आले होते. यामुळे अनेकांनी याचा निषेध नोंदविला होता. याच झाडाच्या खोडाला वंदे मातरम् संघटनेच्या वतीने राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला. तसेच संघटनेने अनेक प्रयत्न करून या वृक्षाला पुनर्जीवित केले आणि या वृक्षाला नव्याने पालवी देखील फुटलेली आहे, याचा आनंद साजरा करत संघटनेने रक्षाबंधन नव्हे, तर वृक्षाबंधन साजरा करत या वृक्षाचे सदैव रक्षण करेल, असे वचन देत रक्षाबंधन साजरा केला. रक्षाबंधन साजरा करत असताना यामध्ये बनवण्यात आलेले राखी ही तिरंगी ठेवण्यात आलेली होती.
कारण आजच्या काळात भारत देशामध्ये वृक्ष संवर्धनाची नितांत गरज आहे, त्यासाठी हा वृक्ष देखील भरभराटीने वाढावा अशी भावना मनात ठेवून ही संकल्पना नियोजनात आली. या वेळी वंदे मातरम संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष जहिर मुलानी, अनिकेत हरपळे, स्वाती बारभाई, श्रीकांत पवार, रसिक जोशी, प्रदीप खेडेकर, भगवान लाखे, संतोष आगलावे, आदेश देवकर, सोनाली खेडेकर, वैष्णवी माने, स्वरांजली सकट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वृक्ष वाचवण्यासाठी वंदे मातरम् संघटनेचा संघर्ष
वृक्ष हा माणसाचा सर्वात मोठा मित्र आहे हे आपणाला ठाऊक आहेच. परंतु याच आपल्या मित्राची रक्षा करण्यासाठी आपण देखील एक पाऊल पुढे येणे गरजेचे आहे, याचाच प्रत्यय जेजुरी येथील बस स्थानक येथे शासनामार्फत चालू असलेल्या विकास कामांमध्ये जेजुरीतील तब्बल ६० वर्षांपूर्वीचे प्राचीन पिंपळाचे झाड विकास कामात बाधा होत असल्याचे कारण देत तोडण्यात आले. परंतु ही बातमी वंदे मातरम् संघटनेला समजतात त्वरित तिथे मोठ्या संख्येने धाव घेऊन त्या वृक्षाचे खोड आणि मूळ वाचवण्यात संघटनेला यश आले. तसेच या वृक्षाला जीवनदान देण्यासाठी वंदे मातरम् संघटनेने शासनाशी आणि स्थानिक प्रशासनाशी कडवा संघर्ष देत वारंवार पत्रव्यवहार करत आपल्या मागण्या मांडल्या. शासनाने हे वृक्ष न तोडता ते पुनर्जीवित करण्यासाठी होकार दिला. याच बरोबर सदर परिसरामध्ये १०० वड, पिंपळ, आणि लिंबाची झाडे लावण्याचे वचन देखील दिले.