जेजुरीः श्री मार्तंड देवसंस्थान यांच्या वतीने खंडेरायाच्या चरणी अर्पण केलेल्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच ते उत्पादन भाविकांना ना नफा न तोटा तत्त्वावर प्रसाद म्हणून वितरण करण्याचा शुभारंभाचा कार्यक्रम मंदिराच्या गडकोट आवारात पार पडला. पर्यावरण संवर्धनावर भर देणारा देवसंस्थानाचा उपक्रम असून, निर्माल्याचे योग्य मार्गाने विनियोग करण्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन इंद्रजीत बागल यांनी केले.
हा कार्यक्रम भारतीय प्रसारण सेवेचे, पश्चिम महाराष्ट्र, संचालक इंद्रजित बागल यांच्या हस्ते संपन्न झाला. नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून श्री खंडोबा मंदिर गडकोट परिसरात ज्या ठिकाणी घट बसतात, त्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये बागल यांनी या उत्पादनाचे लोकार्पण व वितरणाचे उद्घाटन केले.
यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, व्यवस्थापक आशिष बाठे, संतोष खोमणे तसेच सर्व सेवेकरी वृंद व त्यांच्या विद्यार्थी उपस्थित होते. तसेच यावेळी मंदिरातील सेवेकरी व त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व दफ्तराचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी केले. तर उपक्रमाची माहिती प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांनी दिली. उपस्थितांचे स्वागत विश्वस्त मंगेश घोणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष बाठे तर आभार प्रदर्शन अॅड पांडुरंग थोरवे यांनी केले.