पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात आज मतमोजमी झाली. यामध्ये एनडीएला काठावर बहुमत मिळाले तर, तर इंडिया आघाडीनेही मुसंडी मारली आहे.दरम्यान महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत 30 जागा जिंकल्या.
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे आणि एकाच घरातील सदस्यांमध्ये होणाऱ्या लढतीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
दरम्यान बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संधी दिली आहे. या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी आपल्या ट्विटमध्ये सुनेत्रा पवार म्हणाल्या, “लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारते. हाती आलेले निकाल हे अनपेक्षित असले तरी या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करू. नव्याने पुनर्बाधणी करू. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते तसेच सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देते मात्र जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस सदैव तत्पर आहे आणि असेन. पुनःश्च आभार..!”
दरवेळी सुप्रिया सुळे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे अजित पवार यावेळी त्यांच्या विरोधात होते. त्यामुळे यंदा बारामतीत विजय मिळवण्याचे आव्हान सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडे होते.
दरम्यान बारामती लोकसभेतील भोर-मुळशी आणि पुरंदर असे काँग्रेसचे दोनच आमदार सुप्रिया सुळे यांच्याकडे होते. तर सुनेत्रा पवार यांच्या बाजूने 4 आमदार होते. त्यामुळे सुप्रिया सुळे विजय मिळवतील काही नाही याबाबत सर्वत्र चर्चा असायच्या मात्र, आज झालेल्या मतमोजणीत सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार मतांनी विजय मिळवत शरद पवारांचा किल्ला अबाधित राखला.
गेल्या जुलैमध्ये अजित पवार काही आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर शरद पवारांकडे अवघे काहीच आमदार शिल्लक राहिले होते. अशा परिस्थितीतही या लोकसभेत पवारांनी 10 जागा लढवत 8 जागा जिंकत आपली जादू दाखवली. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लढवलेल्या 4 जागांपैकी एका जागेवर विजय मिळवला.