इंदापूर (सचिन आरडे ) : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा सुपात तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे जात्यात असल्याचे चित्र आहे. हर्षवर्धन पाटील हे राजकीय चक्रव्यूहात अडकले असून ते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय मार्गाने जाणार की अपक्ष विमान चिन्हावर लढणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे हर्षवर्धन पाटील यांना भाजप मधून जायचे असेल तर जावू द्या असे म्हणतात तर दुसरीकडे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हर्षवर्धन पाटील हे राज्यातील महत्वपूर्ण नेते असल्याचे म्हणतात. त्यामुळे पडद्यामागे मोठे राजकारण सुरू असल्याचे संकेत आहेत.
भरणेमामा यांच्या उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे सूतोवाच
आमदार दत्तात्रय भरणे यांना जन सन्मान यात्रेनिमित्त आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा बळ देत भरणेमामा यांच्या उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले. त्यातच महायुतीत विद्यमान आमदार यांना प्राधान्याने तिकीट देण्याचे सूत्र सकृतदर्शनी दिसत असल्याने मामांचे तिकीट निश्चित मानले जात आहे. राज्य मंत्री मंडळात विविध २७ खात्यांची जबाबदारी समर्थपणे पेललेल्या हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी पराभव केल्यामुळे भरणे मामा जायंट किलर ठरले होते. आमदारकीच्या पहिल्या कालावधीत तालुक्यात प्रथम भरणे मामा यांनी बेरजेचे राजकारण करत श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील मंदिर तसेच तिर्थटनातून पर्यटनाचा प्रश्न मार्गी लावला तर आमदारकीच्या दुसऱ्या कालावधीत त्यांनी बांधकाम, वने व मत्स्य खात्याचे राज्य मंत्री पद काही काळ भूषविले. भरणे मामा यांनी ५ हजार कोटी हून जास्त रुपयांची कामे मार्गी लावली. त्यात प्रामुख्याने उजनी धरणाच्या भीमा नदीवरील इंदापूर व करमाळा तालुक्यास जोडणारा पूल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गढी संवर्धन, चांद शहावली बाबा दर्गा सुशोभीकरण, इंदापूर न्यायालय सुसज्ज इमारत, लाकडी निंबोडी उपसा जल सिंचन पाणी पुरवठा योजने साठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रस्ताव मंजुरी वर सही घेवून ती मार्गी लावणे आदी लक्षवेधी कामांचा समावेश आहे. मात्र कार्यकर्ते जगविताना त्यांना उप ठेकेदार म्हणून दिलेल्या काही कामाची तसेच काही रस्त्यांची झालेली कामे दर्जाहीन झाली असून काही रस्ते उखडले आहेत तर जल जीवन मिशन च्या कामाबद्दल तालुक्यात खूप नाराजी असल्याचे चित्र आहे. इंदापूर तालुक्यात संथ गतीने सुरू असलेल्या पालखी महामार्गाच्या कामाबद्दल नागरिकात नाराजी आहे. तालुक्यातील सर्व सामान्य जनतेपर्यंत त्यांनी वैयक्तिक लाभा च्या पोहोचवलेल्या योजना, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पाठबळ, त्यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सोसायट्या, छत्रपती सहकारी साखर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेली विकासकामे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र मागील निवडणुकीत शरद पवार हे त्यांचे राजकीय गॉड फादर होते मात्र आता पक्ष फुटी नंतर त्यांच्याच उमेदवारांशी त्यांना लढायचे आहे. त्यामुळे त्यांना विजयासाठी झुंज द्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची जनसुराज्य यात्रा इंदापूर मध्ये भिगवण मार्गे सराटी येथे आली. या पक्षातून आमदारकीस इच्छुक असलेले पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी शक्ती प्रदर्शन करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे लक्ष वेधून घेतले.आप्पासाहेब जगदाळे हे कुस्ती मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन असून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. त्यांचा निवडून येण्याचा स्वतंत्र पॅटर्न आहे. तालुक्यातील अनेक प्राथमिक सोसायट्या, ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेस इंदापूर तालुक्यातून जास्त महसूल मिळवून देण्यास ते आघाडीवर आहेत. ते जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत.
इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ त्यांच्या ताब्यात आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांनी सुरू केलेल्या घोडे बाजाराने राज्यात नाव कमावले आहे. कर्मयोगी तसेच नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा, कांतीलाल झगडे तसेच काही आजी माजी संचालक त्यांच्या समवेत आहेत.माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचा देखील त्यांना पाठिंबा आहे. गेले तीन निवडणुकीपासून ते आमदारकी स इच्छुक आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपल्या सहकाऱ्या समवेत प्रवेश केला. या पक्षाच्या जुने नेते व कार्यकर्ते यांच्या समवेत काम करून त्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना २६ हजार मतांचे मताधिक्य मिळवून देवून त्यांच्या विजयात आपला खारीचा वाटा उचलला. प्रवेश करतानाच त्यांनी शरद पवार साहेब यांच्या कडून आमदारकीच्या तिकिटाचा शब्द घेतल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांना पक्षातून जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती, सोनाई परिवाराचे विश्वस्त, युवा नेते, उत्कृष्ट संघटक प्रविणभैय्या माने यांनी जोरदार आव्हान दिले आहे. प्रविण माने हे लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या पक्षात गेले होते मात्र त्यांनी शरदचंद्र पवार हे आमचे दैवत आहेत असे म्हणत शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला. त्यांनी सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन वेळा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे घेतले आहेत. दुष्काळात पशुधन चारा छावणी उभी करून पशुधन जगविण्यास मदत केली आहे. रक्तदान शिबिर, नेत्र व मोतीबिंदू शिबिर, शेतकरी शिबिर, योग शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेवून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. त्यांनी कुस्तीला देखील राजाश्रय दिला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त सोनाई दूध संघ तसेच सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने यांचे प्रविण हे कर्तबगार चिरंजीव आहेत. त्यांनी युवा उद्योजक म्हणून सोयाबीन ऑईल इंडस्ट्री मध्ये नावलौकिक मिळवला आहे. त्यांची व आप्पासाहेब जगदाळे यांची तिकीटासाठी हेल्दी म्हणजे निरोगी स्पर्धा आहे.
पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी देखील प्रविणभैय्या माने यांना तिकीट द्यावे अशी जाहीर मागणी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या कडे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्त केली आहे. त्यामुळे या पक्षात देखील तिकिट मिळविण्यासाठी स्पर्धा आहे. मात्र आप्पासाहेब जगदाळे व दशरथदादा माने हे चांगले मित्र असल्याने सहमतीने एकाला तिकीट मिळणार असून सध्या तुतारीला चांगले दिवस आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, बारामती ऍग्रो चे अध्यक्ष राजेंद्र पवार, आमदार तथा संचालक रोहित पवार यांची देखील तिकीट मिळालेल्या उमेदवारास निवडून येण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. रोहित पवार यांच्या मलिदा गँग या शब्द प्रयोगामुळे इंदापूर चे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आप्पासाहेब जगदाळे, प्रविणभैय्या माने यांनी युक्तीने शक्ती प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे कोण कोणाला धोबी पछाड करणार याच्या चर्चा सुरू आहेत.
महायुती मध्ये इंदापूर विधानसभेचे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे असले तरी दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड आहे. त्यामुळे राजकीय हालचाली ओळखून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तालुका विकास आघाडीची गावोगावी स्थापना करून राजकीय हालचालीस प्रारंभ केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपली सर्वत्र कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देत आपली सावध भूमिका स्पष्ट केली आहे. खरे तर त्यांनी साडे एकोणीस वर्ष राज्य मंत्री मंडळात विविध २७ खात्याचे मंत्री पद भूषविले आहे. भाजप, शिवसेनेच्या मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर अपक्षांचे नेते म्हणून महाविकास आघाडी सरकार मध्ये त्यांनी संसदीय कार्य मंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यामुळे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे सर्व जण पाहू लागले. मात्र येथेच त्यांच्यावर राजकीय गेम होण्यास सुरुवात झाली. त्यांनी नेमलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधींनी त्यांच्या व जनते मध्ये दुवा म्हणून काम करण्याऐवजी कार्यकर्त्यांना पुणे मुंबई चे हेलपाटे मारायला लावले. त्यातच त्यांची घराणेशाही वाढून आत्मकेंद्रित विकास वाढल्याने नागरिकांनी परिवर्तन केले. त्यांनी सलग तीन वेळा सुप्रियाताई सुळे तर एका निवडणुकीत शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यात आले. त्यांच्या विरोधकांना बळ द्यायचे काम अजितदादा पवार यांनी केले असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. श्री. पाटील यांनी अपक्ष लढून विजयी होवून येणाऱ्या सरकारला पाठिंबा द्यावा असे कार्यकर्त्यांचे म्हणणे असून त्यांनी गावोगावी विकास आघाडीची स्थापना करण्यात आघाडी घेतली आहे. काही कार्यकर्त्यांचे राजकीय बांध ओलांडून थेट शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून तुतारी हातात घ्या असे म्हणणे आहे.
त्यामुळे महायुती मध्ये हर्षवर्धन पाटील हे राजकीय चक्रव्यूहात सापडले आहेत. खरे तर भाजपने त्यांना राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष पद नुकतेच दोन वर्षासाठी दिले मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रवेश करून देखील भाजपने त्यांना एकही लाभाचे पद दिले नाही, त्यांचा मंत्रिपदाचा दांडगा अनुभव असताना देखील त्यांचे साडेचार वर्ष राजकीय पुनर्वसन केले नाही म्हणून काही कार्यकर्ते नाराज आहेत. राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांना कर्मयोगी व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास टॉप टेन मध्ये आणण्याचे आव्हान पेलायचे आहे. एकेकाळी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचे तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या कर्मयोगी कारखान्याचे अर्थकारण धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाठ फिरवली असल्याचे कारखाना कार्यक्षेत्रातील मतदान आकडेवारी वरून दिसत आहे. कर्मयोगी कारखाना कार्यक्षेत्रातील दर्जेदार ऊसावर परिसरातील ५ ते ६ कारखाने ऊस गाळप करत आहेत. त्यामुळे कर्मयोगी कारखान्याची विस्कटलेली आर्थिक घडी त्यांनी दुरुस्त केली तरच सभासदांचा विश्वास त्यांच्यावर बसणार आहे. त्यामुळे जोपर्यंत दोन्ही कारखान्याचे अर्थ व्यवस्थापन चांगले होत नाही, तोपर्यंत प्रदीर्घ राजकीय अनुभव असताना देखील त्यांना विजयी होणे अवघड आहे. खरे तर दोन वेळा राजकीय पराभव होवून देखील तसेच त्यांनी क्षमता असून देखील त्यांनी आत्मपरीक्षण केले नाही. त्यामुळे त्यांच्या पासून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ दुरावला. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व शहा परिवाराशी तात्विक मतभेद झाल्याने शहा परिवार देखील त्यांच्या पासून दूर जात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेला. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यातच त्यांना तुतारी चे तिकीट मिळाल्यास आप्पासाहेब जगदाळे, प्रविणभैय्या माने, भरतशेठ शहा यांची राजकीय भूमिका काय रहाणार आहे हे वेळ काळच ठरविणार आहे.
इंदापूर विधानसभेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
त्यामुळे राजकीय सिंहासनावर आरूढ होण्यासाठी त्यांना चक्र व्युव्हातून बाहेर पडून ठाम निर्णय घेत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे गरुड भरारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती व आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, सर्व प्रमुख संस्था महायुती च्या ताब्यात असताना देखील सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजप इतर उमेदवारांची देखील चाचपणी करत आहे. त्यामध्ये राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे, पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या देखील नावांची चर्चा आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभा सिंहासन संवेदनशील बनले असून प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय स्थिती आणखी संवेदनशील बनणार आहे हे निश्चित. या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच तालुक्यातील ओबीसी नेत्यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. तालुक्याचा पाणी प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारी, शेतीपूरक प्रकल्पांची वानवा, निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, केळी उत्पादन प्रकल्प उभारणी नसल्यामुळे शेतकरी, युवा पिढीत नाराजी आहे. २२ गावांचा बारमाही पाणी प्रश्न देखील अद्याप सुटला नसल्याने शेतकरी नाराज आहेत. काही मतदारांनी दोघे विसरा, काढा तिसरा अशी भूमिका घेतली असून इंदापूर विधानसभेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.