अपघातांचे प्रमाण वाढले; महामार्ग प्रशासनाची कारवाई प्रतीक्षेत
पुणे : पुणे सातारा जाणाऱ्या शिंदेवाडी घाट,खेड शिवापूर,चेलाडी,वेळू,सारोळा या ठिकाणी रस्त्यांवर अनेक ठिकाणी दुभाजक बेकायदा पंक्चर करून रस्ते केले गेले आहेत. हे दुभाजक पंक्चर करण्याचे काम खुलेआम सुरू असून हॉटेल व्यावसायिक,नवीन तयार करण्यात आलेले फूड मॉल व पेट्रोल पंप व्यावसायिकांच्या ठिकाणी अशी तोडा तोड प्रामुख्याने आहे.महामार्गावरील रस्ता दुभाजक आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी तोडण्याचे उद्योग सुरू आहेत. दुभाजक असे बेकायदा तोडले गेलेल्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ते सुरक्षा समितीत दुभाजक तोडणाऱ्या (पंक्चर करणाऱ्या) विरुद्ध कारवाईचा निर्णय आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग ४ वर अशा कारवाईची प्रतीक्षा आहे.
या महामार्गांवर सार्वजनिक महामार्ग प्राधिकरणाच्या विभागाद्वारे तसेच रस्त्यांचे काम केलेल्या खासगी ठेकेदार कंपनीद्वारे रस्ता दुभाजक टाकले गेले आहेत. बहुतांश ठिकाणी असे दुभाजक सिमेंट काँक्रिटचे आहेत. पण अखंड स्वरूपात असलेले बहुतांश असे दुभाजक आपल्या व्यवसायासाठी फायदा व्हावा म्हणून पंक्चर करण्याचे व तेथून रस्ता करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी झाले आहेत. हॉटेल व्यावसायिक व पेट्रोल पंप व्यावसायिकांच्या ठिकाणी अशी तोडा तोड प्रामुख्याने आहे. रस्त्यावरील वाहनांना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी वळणे सोपे जावे म्हणून असे दुभाजक तोडून तेथे रस्ता करण्याचे उद्योग संबंधित व्यावसायिकांसाठी फायदेशीर होत असले तरी महामार्गावरील असे रस्ता दुभाजक तोडलेली ठिकाणे अपघातजन्य स्थळ होऊ लागली आहेत.
पंक्चर केलेले दुभाजक पुन्हा बांधून अखंड करणे व त्यानंतर पुन्हा कोणी असे दुभाजक तोडले तर ते जेथे तोडले गेले आहेत, त्या ठिकाणच्या परिसरातील सर्व व्यावसायिकांवर गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहेत. त्याची अंमलबजावणी महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे. परंतु, अद्याप तोडलेल्या ठिकाणी दुभाजक बांधणीचे कामच सुरू झालेले नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून डोळे झाक होते आहे.परिणामी, अद्याप गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईचा मागमूसही कोठे नाही.
“या अनधिकृतपणे दुभाजक तोडल्याचे आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळवले आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ग्रामीण पोलिसअधिक्षकांकडे याबाबत तक्रार केली आहे.” – अमित भाटिया, पुणे सातारा टोल रोडचे व्यवस्थापक