भोरः सातारा-पुणे महामार्गावरील शिवरे येथे रस्त्याच्या दुभाजकला लागूल असलेल्या मातीच्या ढगाऱ्याला धडकून झालेल्या अपघातामध्ये जीपगाडीचा अशक्षःहा चेंदामेंदा झाला आहे. तसेच या गाडीतील सात जण जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे येथे अपघात प्रवणक्षेत्र निर्माण झाले असून, छोट्या-मोठ्या अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
अंगावर काटा आणणारा अपघात
आज शनिवारी सकाळच्या सुमारास मांढरदेवीहून दर्शन करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या जीपचा विचित्र अपघात अंगावर काटा आणणारा होता, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. सर्वजण मुळशी तालुक्यातील रहिवाशी आहेत. कालिदास बाळू मांडेकर (वय ३३), प्रतिक्षा कालिदास मांडेकर (वय २८), राज्ञी कालिदास मांडेकर (वय ५), बाळा कालिदास मांडेकर (वय ६ महिने), संगीता बाळू मांडेकर (वय ५५), शैला भोते (वय ५०) सर्व रा. चांदे ता. मुळशी, सुदाम दौंडकर (वय ३५) रा. नेरे ( ता. मुळशी ) अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात एक महिला गंभीर असून, इतर सर्व जखमी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
महामार्ग प्राधिकरणसह संबंधित कन्स्ट्रक्शन जबाबदार? मागच्याच माहिन्यात महिलेचा झाला होता मृत्यू
या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचे उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या संबंधित कन्स्ट्रक्शन ठेकेदारावर अंकुश नसल्याचे चर्चा होत आहे. अपघातात या ठिकाणी ठेकेदाराने रिफ्लेक्टर, दिवे, फलक लावणे आवश्यक होते. मात्र, अशी कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. या ठिकाणी अपघात प्रवणक्षेत्र निर्माण झाल्याने मागील महिन्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेत देखील महामार्ग प्राधिकरणसह संबंधित कन्स्ट्रक्शन जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
हॅाटेल व्यावसायिकांचा मनमानी कारभार
पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी अनधिकृत दुभाजके तयार केली जात आहेत. या ठिकाणचे हॅाटेल व्यावसायिक रस्त्याचे कठडे फोडून दुभाजक तयार करीत आहेत. यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा अंदाज येत नसून अपघात घडत आहे. गेल्याच महिन्यात एका महिल्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. यामुळे आता रस्ता प्राधिकरण या सगळ्या प्रकारावर अंकुश ठेवून संबंधित हॅाटेल व्यावसायिकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.