लोणी काळभोर (पुणे) : तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या प्रत्येक आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणे प्रत्येक गाव तलाठी कार्यालयावर कायद्याने बंधनकारक असतानाही हवेलीमधील अनेक गाव कामगार तलाठी प्रोटोकॉलसाठी तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पूर्व हवेलीत एका शेतकऱ्याने शासन परिपत्रकानुसार शासकीय तिजोरीत २५ टक्के नजराण्याचे चलन भरल्याने हवेली तहसीलदार कार्यालयाने संबंधित शेतकऱ्याची इतर हक्कातील फेरफार नोंद मालकी हक्कात करण्याबाबतचा आदेश ४ ऑगस्टला दिला होता.
दरम्यान, थेऊर तलाठी कार्यालयाकडून घडलेले हे विलंबाचे प्रकरण हिमनगाचा एक छोटासा तुकडा असून, हवेलीत अशी अनेक प्रकरणे प्रोटोकॉलसाठी रखडलेली असल्याचा आरोप हवेलीमधील अनेक शेतकऱ्यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना केला. तर पूर्व हवेलीमधील काही तलाठी कार्यालये खातेदार शेतकऱ्यांची आर्थिक कारणांसाठी अडवणूक करत असल्याच्या चर्चा आमच्याही कानावर आलेल्या असून, थेऊर तलाठी कार्यालय व इतर तलाठी कार्यालयाबाबत काम करण्यास टाळाटाळ होत असल्यास शेतकरी बांधवांनी थेट ग्राहक पंचायतीकडे लेखी तक्रारी कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप शिवरकर यांनी केले.