गोव्याच्या बदलेल्या स्वरूपाचे श्रेय सर्वार्थाने भाजपाचेच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चिंबलेः लोकशाहीच्या निवडणुकांच्या समरामध्ये कार्यालय किल्ल्याची भूमिका बजावते. गोव्यातील प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन करून घर होताना, होणार्या आनंदाची अनुभूती मिळाली. एखादे कार्यालय किती सुंदर आहे यावरून नाही, तर कार्यालयातून चालणार्या कारभारावरून त्याचे महत्त्व ठरते. येथे निर्माण होणार्या भव्य वास्तूपेक्षाही येथे सुंदर कारभार चालेल हा विश्वास आहे. गोवा भाजपा प्रदेश कार्यालयाचे चिंबेल-कदंब पठार, गोवा येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित भाजपा गोवा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या नॅरेटीव्हचा परिणाम दिसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्यांची रणनीती समाजात अराजकता निर्माण करण्याची आहे. देशात अराजकता पसरवणार्या शक्ती यासाठी एकत्र आल्या असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. तसेच पुढची लढाई लोकशाहीच्या संरक्षणाची आहे. काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणून तेथून भारताचा तिरंगा हटवण्याचा ज्यांचा हेतू आहे, अशा नॅशनल कॉन्फरंस सोबत कॉंग्रेसने काश्मीरमध्ये युती करणे हा पुरावा आहे की, मोदीजींच्या द्वेषापोटी विरोधक देशाला तोडणार्या शक्तींसोबतसुद्धा जावू शकतात, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात विकसित गोव्याच्या निर्मितीचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा गोव्यामध्ये परिणाम पाहायला मिळतो आहे. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हा भाजपाचा मंत्र आहे, म्हणून येथे काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता देशभक्त आहे. या देशभक्त कार्यकर्त्यांना हे कार्यालय देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्याचे बळ देईल असा विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मा. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.