वेल्हाः बारामती लोकसभा मतदार संघात येणारा आणि भोर विधानसभा क्षेत्राचा अविभाज्य भाग असलेल्या वेल्हा तालुक्याची ओळख आजही दुर्गम भाग अशीच केली जाते. याची प्रचिती अधिक गडद झाली आहे, ती वेल्हा येथे राहणाऱ्या एका तरुणीने लिहिलेल्या पत्रामुळे. नोकरी निमित्त वेल्हा-पुणे प्रवास करणाऱ्या तरुणीने अनेक प्रश्न उपस्थित करुन पत्राद्वारे आपली कैफियत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली आहे. तसेच तिने मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, अशी आशा मयुरी राजेंद्र पगारे हिने खा. सुप्रिया सुळे यांना लिहिलेल्या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
काय आहे पत्रामध्ये? मुयरी पगारे हिने लिहिलेल्या पत्राचा संपादित अंश खालीलप्रमाणे
आदरणीय ताई, तुम्हाला पत्र लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे सामान्य जनतेचे चालेले हाल. मी कु. मयुरी राजेंद्र पांगारे तुमच्याच वेल्हा तालुक्यातील वेल्हे गावाची स्थानिक रहिवासी आहे. नोकरीनिमित्त वेल्हे ते पुणे दररोज प्रवास मला करावा लागतो. हे सगळ ठीक आहे, ती परिस्थिती आम्ही स्वीकारली देखील आहे. त्यासाठी आपण पी. एम. पी. एम. एल. ची सेवा चालू सुद्धा केली. ती आधी वेल्हे पर्यंत होती, नंतर काही कारणास्तव ती बंद होऊन पीएमआरडीए हद्पर्यंत चालू ठेवण्यात आली.
प्रवास देणाऱ्या सुविधांचा अभाव आजही कायम
जे की योग्य आहे, पण ती पीएमआरडीच्या हद्दपर्यंत फक्त पाबेपर्यंत आहे तिथून पुढे काय? एसटी महामंडळच्या एसटीने प्रवास करावा तर त्याची सुविधा नीट नाही. उलट तालुकाच्या ठिकाणी एकच एसटी येणार तिचा काही वेळ फिक्स नाही. तिचं एक एसटी तिथून पुढे मावळ भागात जाते. जसे की कोदापुर आदी गावात तिच एसटी पुढे वेल्ह्यात येते. तिथून चेलाडी, वेल्हे गावाला ना पीएमटीची सुविधा नीट आहे, ना एसटीची. दररोज प्रवास करण्यासाठी कोणतीच सुविधा वेल्हा तालुक्यात ठीक नाही.
शिक्षण, नोकरीनिमित्त करावा लागतोय प्रवास
बरं या भागात वडाप , जीपवाले आहेत, त्यांची दादागिरी चालू आहे. इथपर्यंत नाही सोडणार इथपर्यंत यावं लागेल. असे ते म्हणतात. ज्या सुविधा आहेत. त्याचा वापर नाही, तर त्या सुविधा देखील उपलब्ध नाहीयेत. असा वेळी माझ्या सारख्या कित्येक मुलींनी करावे तरी काय? असा प्रश्न आहे. ज्यांना दररोज नोकरी निमित्त प्रवास करावा लागतो, आज आपल्या तालुक्यात खूप मुला मुलींना शिक्षणानिमित्त, नोकरी निमित्त सतत प्रवास करावा लागतो. पण त्या प्रवासासाठी कोणतीही सुविधा नीट उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत आम्ही वेल्हा तालुक्यातील मुले-मुली जगात चालणाऱ्या स्पर्धांना कसे तोंड देऊ, कसे या स्पर्धेच्या युगात सहभागी होऊ, कसे पाय रोऊन उभे राहू, हा मोठा प्रश्न आहे.
बेसिक सुविधांचा अभाव
ज्या ठिकाणी बेसिक सुविधाच आम्हाला उपलब्ध होत नाहीत. कधीपर्यंत वेल्हे तालुक्याची ओळख आम्ही दुर्गम म्हणूनच सांगू? तालुका असलेल्या गावात ना शिक्षणाची सोय आहे, ना त्या शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठी लागणाऱ्या सरकारी सुविधांची, कधीपर्यंत हा प्रश्न असाच राहणार आहे? अशा प्रश्नांमुळे कित्येक मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. आपण हे प्रश्न मार्गी लावाल अशी आशा व्यक्त करते. तुमच्याच मतदासंघांतील सामान्य नागरिक
-मयुरी राजेंद्र पांगारे (राहणार वेल्हे)