भोर: तालुक्यातील न्हावी गावातील २२ वर्षीय अजय शिंदे याने शिरवळ पोलिसांच्या मारहाणीला घाबरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजयच्या कुटुंबीयांनी पोलिसांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, काही राजकीय नेते आणि पोलिस प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आर्थिक तडजोडीच्या माध्यमातून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
खून प्रकरण आणि चौकशी
शिरवळ औद्योगिक वसाहतीतील चौकात २२ वर्षीय अमर ऊर्फ चंदू शांताराम कोंढाळकर याचा १९ वर्षीय तेजस महेंद्र निगडे याने तलवारीने वार करून खून केला होता. घटनेनंतर तेजस स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अजय शिंदे याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, चौकशीदरम्यान अजयला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या अजयने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
तणाव आणि आर्थिक तडजोड
या घटनेनंतर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. अजयच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, काही तासांच्या गोंधळानंतर राजकीय नेते आणि पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कुटुंबीयांना आर्थिक स्वरूपात १२ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांवरील आरोप मागे घेतल्याचे बोलले जात आहे.
प्रकरणी तापसी अधिकारी बदलले…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामुळे पोलिस दलावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. परिणामी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्याकडून हे प्रकरण काढून घेत खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील शेळके यांच्याकडे सोपवले आहे.
न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांवरील विश्वासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर आर्थिक तडजोडीच्या माध्यमातून प्रकरण मिटवले जात असेल, तर न्यायाची प्रक्रिया पारदर्शक राहील का, हा प्रश्न उपस्थित होतो. अजयच्या कुटुंबीयांना झालेली मदत त्यांच्या दु:खावर फुंकर घालणारी असली, तरी दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकशीच्या नावाखाली मारहाण योग्य आहे का?
कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि नैतिकतेच्या दृष्टीने, पोलिसांकडून चौकशीच्या नावाखाली मारहाण करणे पूर्णतः अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. यामुळे शिरवळ पोलिस ठाण्यातील संबंधित मारहाण करणारे चार पोलिस यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे परंतु वरिष्ठ याकडे कशा प्रकारे लक्ष घालतील हे पुढील काळात समोर येईलच.