बारामती : तालुक्यातील होळ येथे 9 वर्षीय मुलाचा वडिलांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय गणेश भंडलकर (रा. होळ, बारामती) यांनी आपल्या मुलाचा अभ्यास न केल्याच्या रागातून भिंतीवर आपटून व गळा आवळून खून केला. या घटनेत मुलाचे वडील विजय भंडलकर, आजी शालन भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ जानेवारी रोजी दुपारी साडेअडीचच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पियुष भंडलकर घरात असताना विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यास न केल्यामुळे रागावले. ‘तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस,’ असे म्हणत रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले आणि त्याचा गळा आवळला. यामुळे पियुषचा जागीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी आजी शालन भंडलकर उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट विजय भंडलकर यांच्या सांगण्यावरून पियुषला चक्कर येऊन पडल्याचे खोटे कारण पुढे केले. मृत पियुषला संतोष भंडलकर यांनी निरा येथील भट्टड डॉक्टरांकडे नेले. तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित करून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी पोलीस पाटील व इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी केली.
पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी त्वरित हस्तक्षेप करून तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत विजय भंडलकरने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास आहे.