तळेगाव ढमढेरेः प्रतिनिधी आकाश भोरडे
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील घटनेने सर्वत्र सरकार विरुध्द रोष व्यक्त केला जात आहे, मात्र युवतींवरील अत्याचाराच्या घटना लक्षात घेता सरकारने मुली व युवतींच्या स्वसंरक्षणाची गरज ओळखून युवतींना शालेय स्कूल बॅगमध्ये स्वसंरक्षणाच्या वस्तू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे करत याबाबतचे निवेदन शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना दिले आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पवयीन बालिकांसह युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने सर्वत्र असंतोष पसरला आहे. शाळेमधील कर्मचारी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असतील, तर कायद्याचा धाक राहिलाय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सरकारने युवतींना शालेय स्कूल बॅगमध्ये स्वसंरक्षणाच्या वस्तू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केली आहे.