पारगांवः धनाजी ताकवणे
गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह इतर भागात पावसाचा कहर पाहिला मिळत आहे. दौंड तालुक्यातील पारंगावात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत आहे. येथील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. गेली चार दिवस सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पारगाव बाजारपेठेतील दुतर्फा पाण्याच्या चाऱ्या होणे गरजेचे असून तसेच काही ठिकाणी या चाऱ्या होऊ न दिल्याने अडविल्याने बाजारपेठेतील नागरिकांना अशा नैसर्गिक समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत आहे, अशी व्यापाऱ्यांच्यातून चर्चा आहे.
ग्रामपंचायत पारगांवने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा व या समस्येची दखल घ्यावी अशी व्यापाऱ्यांच्यातून मागणी करण्यात येत आहे. याचबरोबर गेली चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. तर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतामध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले असून कांद्याची टाकलेली रोपे, भाजीपाला, ऊस , बाजरी या पिकांचेही मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या मुसळधार पावसाने दौंड तालुक्यातील अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.