राजगड वृत्तसेवा
अलिबाग/ रायगड: टाटा स्टारबक्सने अलिबाग ह्या समुद्रकिनाऱ्यावरील नयनरम्य स्थळी आपल्या पहिल्या आयलंड स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा केली.स्थानिक ग्राहकांना तसेच सुटी घालवत असताना आपल्या आवडत्या स्टारबक्स कॉफीहाउसच्या चवीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना स्टारबक्सचा खास अनुभव देण्याच्या दृष्टीने स्टोअरचे हे नवीन स्वरूप विकसित करण्यात आले आहे. अलिबाग हे मुंबईकरांसाठी सर्वाधिक पसंतीचे ‘सेकंड-होम’ स्थळ तसेच वीकेण्ड घालवण्याचे ठिकाण ठरत आहे. त्याचबरोबर ह्या किनारपट्टीवरील शहरामध्ये पायाभूत सुविधा तसेच आर्थिक विकासही वेगाने होत आहे. ह्या सर्व घडामोडींमुळे खाद्य-पेयांच्या वैविध्यपूर्ण अनुभवांची सुप्त मागणी आता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे साहजिकच टाटा स्टारबक्सने अलिबागमध्ये हे नवीन स्वरूपातील स्टोअर सुरू केले आहे.
अलिबागमधील एम२एम फेरी टर्मिनल ह्या मोक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या नवीन स्टोअरमध्ये, जगभरातून आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम कॉफी बीन्स (कॉफीच्या बिया) ब्रू करून, स्टारबक्सचे वैशिष्ट्य असलेल्या सर्व प्रकारच्या कॉफी, ग्राहकांना देऊ केल्या जाणार आहेत. ह्याशिवाय स्टारबक्स काही स्थानिक पेयेही देणार आहे. ह्यांमध्ये साउथ इंडियन फिल्टर कॉफी, मसाला चाय, इलायची चाय, अनेक प्रकारचे सिग्नेचर मिल्कशेक्स आहेत. ह्यांसोबतच तंदुरी चिकन पॅनिनी सॅण्डविच, स्पाइस्ड कॉटेज चीज फोकशिया सॅण्डविच, हर्ब्ड चिकन फोकशिया सॅण्डविच आदी खाद्यपदार्थही येथे उपलब्ध असतील. अरबी समुद्राची गाज आणि निसर्गरम्य देखाव्याने वेढलेले हे पहिले स्टारबक्स आयलंड स्टोअर ग्राहकांना एक वैशिष्ट्यपूर्ण ‘थर्ड प्लेस (घर व कामाची जागा सोडून तिसरे जग)’ अनुभव देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. २५०० चौरस फूट जागेत पसरलेल्या ह्या स्टोअरमध्ये अलिबागमधील निवांत उत्साहाचा अनुभव आहे. स्टोअरच्या आतिथ्यशील व आकर्षक वातावरणामागील प्रेरणा आजूबाजूच्या निसर्गानेच दिली आहे.
स्टारबक्सच्या समुद्री उगमस्थानाला वंदन करणाऱ्या आणि किनारपट्टीवरील पुराणकथांच्या समृद्ध ताण्याबाण्यांची आठवण करून देणाऱ्या आकर्षक कलाकृतींनी हे स्टोअर सजवण्यात आले आहे. मोबी डिक ह्या काल्पनिक व्हाइट व्हेलचे लक्ष वेधून घेणारे चित्र भिंतींची शोभा वाढवत आहे. हे उत्कृष्टतेच्या शोधाचेही प्रतीक आहे.
स्टारबक्स इंटरनॅशनल व चॅनल डेव्हपलमेंटचे समूह अध्यक्ष मायकेल कॉनवे सांगतात, “भारतीय ग्राहकांनी ज्या प्रकारे स्टारबक्सला मानवी संबंध जपण्याचे स्थळ केले आहे ते बघून मला खूप आनंद वाटतो. मग ते संबंध आमच्या ग्रीन एप्रन पार्टनर्ससोबत असोत किंवा स्वत:च्या कुटुंबीय व मित्रमंडळींसोबत असोत. स्टारबक्ससाठी भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ असल्यामुळे आम्ही नवोन्मेषाची ग्वाही देत आहोत. आमच्या ग्राहकांच्या अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी करण्यास तसेच भारतभरातील उत्साही कॉफी समुदाय जोपासण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.”
टाटा स्टारबक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुशांत दाश ब्रॅण्डच्या भारतातील वाढीबाबत विचार मांडताना सांगतात, “दहा वर्षांहून अधिक काळापासून टाटा स्टारबक्सभारतातील ग्राहकांना अद्वितीय कॉफी अनुभव देण्याचे उद्दिष्ट अविचलपणे पूर्ण करत आहे. स्थानिक नवोन्मेषांचा परिचय करून देण्यापासून ते ड्राइव्ह-थ्रूज व २४X७ स्टोअर्ससारख्या वैविध्यपूर्ण स्वरूपांचा विस्तार करण्यापर्यंत अनेकविध प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही स्टारबक्सचा अनुभव भारतातील अधिकाधिक कॉफीप्रेमींपर्यंत सातत्याने पोहोचवत आहोत.
स्टारबक्सचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव ग्राहकांना देणे हा आमच्या बाजारपेठेतील यशाचा पाया आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या सातत्याने बदलत असलेल्या प्राधान्यक्रमांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये सातत्याने नवोन्मेष घडवत आहोत तसेच ती व्यक्तीनुरूप राखण्याचा प्रयत्न करत आहोत. अलिबाग येथे भारतातील पहिले आयलंड स्टोअर सुरू करून आम्ही आमचा ग्राहककेंद्री दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. नजीकच्या भविष्यकाळात, ह्या अनोख्या संकल्पनेवर आधारित स्टोअरमध्ये कॉफीप्रेमींचे स्वागत करण्यास, आम्ही उत्सुक आहोत.”