शिरवळ : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाकरीता बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरीता शिरवळ येथील मराठा समाजबांधवाकडून रविवार दि.२९ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणेत येणार असून या बाबतचे निवेदन शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरीता सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने मनोज जरांगे-पाटील यांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी असून त्यांच्या भूमिकेला आम्ही शेवटपर्यंत समर्थन देणार आहोत. आम्ही मराठा आरक्षणासाठी काहीही करायला तयार असल्याचे मत मराठा समाजाच्या युवकांतर्फे यावेळी व्यक्त करण्यात आले.सर्व सकल समाज मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन करणार आहोत. आमच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या असून, येथून पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी या आरक्षणाच्या लढाईत आम्ही सर्वांबरोबर असणार व मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढवण्यासाठी सज्ज आहोत.
पूर्वीचा आणि आत्ताचा मराठा समाज यामध्ये खूप बदल झाला असून आज नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज आहे. पूर्वी समाजामध्ये गरज नव्हती. पण आता ती गरज महत्वाची आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारे असून मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न जर राजकीय मंडळी करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.त्यासाठी शिरवळ व परिसरातील समस्त सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरीता शिरवळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय रविवार दि. २९ रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती निवेदनाद्वारे सकल मराठा समाजातील तरुणांनी दिली आहे.